बेकायदा उत्खनन प्रकरणी कारवाई
By admin | Published: May 6, 2016 12:58 AM2016-05-06T00:58:27+5:302016-05-06T00:58:27+5:30
काशिमीरा येथील डी. बी. रियालिटीच्या नियोजित बांधकाम प्रकल्पाच्या जागेत बेकायदा उत्खनन केल्याप्रकरणी बुधवारी मंडळ अधिकारी व तलाठी यांनी घटनास्थळाहून दोन पोकलन
मीरा रोड : काशिमीरा येथील डी. बी. रियालिटीच्या नियोजित बांधकाम प्रकल्पाच्या जागेत बेकायदा उत्खनन केल्याप्रकरणी बुधवारी मंडळ अधिकारी व तलाठी यांनी घटनास्थळाहून दोन पोकलन यंत्र सील केली. तब्बल सहा हजार ३५८ ब्रास उत्खनन करण्यात आले.
मुंबई- अहमदाबाद महामार्गावर ठाकूर मॉलजवळ सर्वे क्र. ९२ ही जमीन इस्टेट इन्वेस्टमेंट कंपनीच्या नावे आहे. डी. बी. रियालीटीने या ठिकाणी विकासकाम प्रस्तावित केले आहे. या जागेतून विकास आराखड्यातील रस्ता जात असल्याने तो विकसक विकसीत करुन देणार आहे. त्याचा मोबदला पालिका टीडीआरच्या माध्यमातून विकसकास देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हे ठिकाण डोंगराळ भागात असल्याने रस्ता व इमारत बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरु होते. ही बाब मंडळ अधिकारी पवार व तलाठी अभिजीत बोडके यांच्या निदर्शनास आली. त्यांनी घटनास्थळी जाऊन कारवाई केली. या ठिकाणी ६,३५८ ब्रास इतके दगड व मातीचे उत्खनन झाले आहे. पवार यांनी दोन्ही पोकलेन यंत्रे सील केली आहेत. उत्खननातील सुमारे ९७७ ब्रास माती दगड जवळच्याच जागेत टाकले आहे.
या प्रकरणी तहसीलदार यांना अहवाल पाठवला असून त्यांच्याकडून आदेश येताच त्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल असे पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मोठ्या प्रमाणात
झाडांची कत्तल
उत्खन्नाच्या ठिकाणी मोठी व जुनी झाडे होती. काही झाडे सुकली आहेत. तर अनेक मोठी व जुनी झाडे कापली आहेत.वास्तविक मोठी व जुनी झाडे कापण्याची फारच गरज असल्यास त्याची परवानगी महापालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग देतो. येथील झाडांच्या कत्तलीबाबत पालिकेच्या वृक्ष विभागाचे हंसराज मेश्राम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.