ठाणे : मिठाई विक्रेते मिठाईचे वजन करताना खोक्यासह वजन करत असल्याने मिठाई कमी मिळत असल्याच्या तक्रारी वैधमापनशास्त्र विभागास प्राप्त झाल्या. तक्रारींनुसार अचानक राबविलेल्या तपासणी मोहिमेत जिल्ह्यातील ३७ मिठाई विक्रेत्यांविरुद्ध वैधमापनशास्त्र उल्लंघनाबाबत खटले दाखल केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने मिठाई वजनात कमी देणे, विक्रेत्यांकडे वापरात असलेले वजने-काटे पडताळणी व मुद्रांकन करून न घेणे व कायद्यातील इतर तरतुदींचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्याची माहिती सूत्रांनी दिली.याबाबत ग्राहकांनी जागरूक राहून खरेदी करणे आवश्यक आहे. वस्तू खरेदी करताना दिलेल्या मोबदल्यानुसार वजनात/मापात वस्तू बरोबर मिळतील, याची खात्री करावी. इलेक्ट्रॉनिक काट्याच्या इंडिकेटरवर ०० (शून्य) असल्याखेरीज वजन केले जाणार नाही, याकडे लक्ष ठेवावे. मिठाई, ड्रायफ्रूट, मावा इत्यादी खरेदी करताना त्यांचे वजन खोक्याशिवाय करणे दुकानदारास बंधनकारक आहे. म्हणजेच, दुकानदाराने वस्तूचे निव्वळ वजन करूनच विक्री करावी. व्यापाऱ्याने इलेक्ट्रॉनिक काटा व काट्याचा इंडिकेटर अशा ठिकाणी ठेवावा की, वजन करण्याची संपूर्ण प्रक्रिया ग्राहकास स्पष्ट दिसेल. याबाबत, ग्राहकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करताना काही गैरप्रकार आढळल्यास नियंत्रण वैधमापनशास्त्र, मुंबईच्या नियंत्रण कक्षातील दूरध्वनीवर संपर्कसाधण्याचे ठाणे वैधमापनशास्त्र, सहायक नियंत्रक एस.एस. कदम यांनी सांगितले.
ठाण्यात ३७ मिठाई विक्रे त्यांविरु द्ध कारवाई
By admin | Published: February 11, 2016 1:45 AM