लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणो : अंगणवाडी सेविकांनी राज्यभर आंदोलन छेडून जुने मोबाईल शासनास परत केले. त्यास अनुसरून जमा केलेल्या या मोबाईलची दुरुस्ती तत्काळ करून ते पुन्हा वापरण्यासाठी देण्यात यावेत. मात्र, नादुरुस्त नसतानाही मोबाईल जमा केला असेल, तर त्या अंगणवाडीसेविकांवर कडक कारवाई करावी, असे आदेश शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांनी १५ सप्टेंबरच्या आदेशात नमूद केले आहे.
राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने राज्यभर मोबाईल वापसी आंदोलन गेल्या महिन्यात केले. त्यात सहभागी होऊन अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याजवळील मोबाईल ठिकठिकाणच्या बाल विकास प्रकल्प कार्यालयात जमा केले आहेत. ठाणे जिल्ह्यात तब्बल दोन हजार ७०० च्या जवळपास मोबाईल जमा झाले आहेत. यात सर्वाधिक शहरी भागातील सेविकांनी ते जमा केल्याचे दिसून येत आहे. या आंदोलनाची दखल घेऊन एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्तांनी बुधवारी हे आदेश जारी केले आहेत.
या आदेशामध्ये बाल विकास प्रकल्प कार्यालयात जमा केलेले मोबाइल फोन २० सप्टेंबरपर्यंत नजिकच्या मोबाइल सर्व्हिस सेंटरमध्ये जमा करावेत. त्यांची तत्काळ दुरुस्ती करून घेण्याची कार्यवाही बाल विकास प्रकल्प अधिका:यांनी करावी. एवढेच नव्हे तर बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात जमा केलेल्या मोबाइलच्या एकूण संख्येचा अहवाल आयुक्त कार्यालयात द्यावा. सर्व्हिस सेंटरमध्ये जमा केलेल्या एकूण मोबाईलपैकी किती दुरुस्त होण्यायोग्य आहेत व किती दुरुस्त होण्यासारखे नाहीत, याची माहिती सर्व्हिस सेंटरकडून घेऊन तसा अहवालही आयुक्तालयास पाठवावा. जे मोबाईल फोन चालू स्थितीत होते म्हणजेच नादुरुस्त नव्हते, तरीदेखील जमा केलेले आहेत, अशा मोबाईलधारक सेविकांवर तातडीने कडक कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल २२ सप्टेंबरपर्यंत आयुक्त कार्यालयास सादर करावा, असे आदेश पोषण अभियानचे आयुक्त तथा राज्य प्रकल्प संचालकांनी जारी केले आहेत.