कोरोना मृतांमध्ये ‘संशयितांच्या’ अहवालाची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:06 AM2021-05-05T05:06:33+5:302021-05-05T05:06:33+5:30

कल्याण : सध्या कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत दररोज नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाली असली तरी काही दिवसांपासून ...

Addition of ‘suspects’ report to Corona dead | कोरोना मृतांमध्ये ‘संशयितांच्या’ अहवालाची भर

कोरोना मृतांमध्ये ‘संशयितांच्या’ अहवालाची भर

Next

कल्याण : सध्या कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत दररोज नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाली असली तरी काही दिवसांपासून मृतांची संख्या आठ ते तेरा आहे. ही वाढलेली संख्या चिंताजनक असली तरी मृत्युमुखी पडणारे रुग्ण केवळ २४ तासांतील नाहीत. जे रुग्ण कोरोना संशयित म्हणून रुग्णालयात दाखल होतात आणि मृत पावतात त्यांच्या कोरोना चाचणीचा पॉझिटिव्ह अहवाल दोन ते तीन दिवसांनी मिळतो. त्यामुळे या अहवालानुसार त्या मृतांचाही यात समावेश केला जात असल्याने मृतांचा आकडा काहीसा वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

केडीएमसी हद्दीत आजवर एक लाख २२ हजार ७७३ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एक हजार ४६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर एक लाख ११ हजार ३८० रुग्ण बरे झाले आहेत. तर सोमवारपर्यंतचा आढावा घेता सध्या नऊ हजार ९३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एप्रिलमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच कहर केला. या महिन्यात कोरोनाचे ४१ हजार ५५१ नवे रुग्ण आढळले आहेत. ३७ हजार ६२० रुग्ण महिनाभरात उपचाराअंती बरे झाले असले तरी १७८ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सध्या कोरोनाच्या नव्याने आढळणाऱ्या रुग्णांमध्ये काहीशी घट झाली असली तरी मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत चार ते पाच रुग्णांचा मृत्यू व्हायचा; परंतु २१ एप्रिलपासून यात वाढ होऊन मृतांचा आकडा आठ ते १० पर्यंत गेला. ३० एप्रिलला तर १३ जणांचा मृत्यू झाला होता. ही आजवरची मृतांची सर्वोच्च संख्या आहे. सध्या मृतांचे प्रमाण आठ ते १० च्या आसपास आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मनपा हद्दीतील मृत्यूदर १.६७ टक्के इतका होता. तिसऱ्या आठवड्यात तो १.२६ टक्क्यापर्यंत कमी झाला तर सध्या मृतांची संख्या वाढलेली दिसत असली तरी मृत्यूदर १.१९ टक्के इतका आहे.

सुरुवातीपासूनच मृत्यूदर कमी

रूक्मिणीबाई रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोना संशयित रुग्णांपैकी काही जण उपचारादरम्यान मृत्यू पावतात. अशा रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी गेलेले असतात. त्याचा रिपोर्ट अहवाल जर पॉझिटिव्ह आला तर एमसीआरकडून आलेल्या अहवालानुसारच त्याची ‘कोरोनाने मृत्यू’ अशी नोंद केली जाते. हे अहवाल दोन ते तीन दिवसांच्या फरकाने उपलब्ध होतात. त्यांचाही समावेश दैनंदिन जाहीर केल्या जात असलेल्या मृतांच्या आकडेवारीत केला जातो. त्यामुळे सर्वच मृत रुग्ण हे २४ तासांतीलच असतात असे नाही, तसेच आपल्याकडे सुरुवातीपासूनच मृत्यूदर हा कमी आहे, ही समाधानाची बाब आहे, असे केडीएमसीच्या साथरोग नियंत्रक विभागाच्या अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले.

--------------------

Web Title: Addition of ‘suspects’ report to Corona dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.