ठाणे : नामांकीत बांधकाम व्यावसायिक सूरज परमार आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी तपासाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली आहे. या घटनेच्या १० दिवसांनतर शनिवारी दुपारी ठाणे पोलिसांनी ठामपाच्या अतिरिक्त आयुक्तांच्या दालनाची झाडाझडती घेऊन काही फाईल व कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.परमार यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटचा तपासणी अहवाल अद्यापही फॉरेन्सिक लॅबमधून आलेला नाही. मात्र, अधिकारी आणि पालिकेतील राजकीय गोल्डन गँगची नावे चर्चेत आल्याने शनिवारी ठाणे पोलिसांनी ही चौकशी ठामपाच्या अधिकाऱ्यांपासून सुरू केली आहे. त्यानुसार, दुपारी सुरू असलेली ही झाडाझडती बराच काळ सुरू होती. दरम्यानच्या काळात एकाही अधिकाऱ्याला फोनचा वापर करू दिला नसल्याचे वृत्त आहे. या चौकशीदरम्यान तपासाशी संबधित अनेक कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, एरवी पालिकेच्या सेवेत असूनही आपल्या दालनात न बसणारे अनेक अधिकारी या चौकशीदरम्यान पालिकेमध्ये हजर असल्याचे दिसून आले, तर कोणतीही पूर्वसूचना न देता, पोलिसांनी ही चौकशी सुरू केल्यामुळे ठामपा अधिकाऱ्यांमध्ये घबराट पसरली होती.परमार प्रकरणात पोलिसांना काही माहिती हवी होती, त्यानुसार ते काही फाईलच्या पडताळणीसाठी ते कार्यालयात आले होते. ती केल्यानंतर ते निघून गेले. परंतु कोणतेही कागदपत्रे घेऊन गेले नाहीत.- सुनील चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, ठामपा
परमार यांनी सादर केलेल्या विकास प्रस्तावाच्या फाईल तपासण्यात आल्या असून त्याच्या प्रती ताब्यात घेतल्या आहेत.- दिलीप गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, ठाणे पोलीस