पायाभूत सुविधांच्या विकासाचा फायदा जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी जनतेला- पालकमंत्री एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 01:23 PM2018-01-26T13:23:59+5:302018-01-26T13:24:07+5:30
ठाणे जिल्ह्यातील विकासाच्या नव्या संधींचा फायदा येथील ग्रामीण आणि शहरी जनतेला होणार आहे. मग ते ग्रोथ सेंटर असेल किंवा बिझनेस हब, मेट्रो, जलवाहतूक, सक्षम आरोग्य सेवा, क्लस्टर डेव्हलपमेंट असेल असे उद्गार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले
ठाणे- ठाणे जिल्ह्यातील विकासाच्या नव्या संधींचा फायदा येथील ग्रामीण आणि शहरी जनतेला होणार आहे. मग ते ग्रोथ सेंटर असेल किंवा बिझनेस हब, मेट्रो, जलवाहतूक, सक्षम आरोग्य सेवा, क्लस्टर डेव्हलपमेंट असेल असे उद्गार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
भारतीय प्रजासत्ताकाच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त आज सकाळी साकेत मैदान येथे मुख्य शासकीय सोहळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये राज्य राखीव दलापासून, ठाणे शहर पोलीस, वाहतूक पोलीस, कारागृह रक्षक, गृहरक्षक, कमांडो पथक,बॉम्बशोधक आणि नाशक पथक, दंगारोधक पथक अशा विविध पथकांचा समावेश होता.
शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनादेखील कर्जमाफीचा लाभ झाला असून ५० कोटी १६ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं.
सिंचन क्षमता वाढली
जलयुक्त शिवाराच्या या कामांमुळे जिल्ह्याची सिंचन क्षमता सात हजार हेक्टरनं वाढली असून रब्बीच्या दुबार क्षेत्रात सुमारे साडे तीन हजार हेक्टरनं वाढ झाली आहे. जिल्ह्यात ४ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड करण्यात आली असून प्रधानमंत्री आवास योजना तसंच, शबरी, रमाई या योजनांतर्गत परवडणारी घरं निर्माण करण्यात ठाणे जिल्हा आघाडीवर असल्याबद्धल त्यांनी अभिनंदन केले.
गतिमान प्रशासनाचे उत्तम उदाहरण
ग्रामविकास आणि महसूल विभागानं शंभर टक्के अर्ज निकाली काढून गतिमान प्रशासनाचं उत्तम उदाहरण आपल्या सर्वांसमोर ठेवलं आहे त्याचेही त्यांनी कौतुक केले. नागरिकांना तत्पर सेवा देण्यासाठी जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये ३२ वर्क स्टेशन्स कार्यरत करण्यात आली असून ई-फेरफार, ऑनलाइन डाटा अपडेशन या सेवांमुळे शेतकरी आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे असे ते म्हणाले.
पर्यटनाला चालना
ठाणे जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी माळशेज घाटात जागतिक दर्जाचा स्कायवॉक बांधण्यात येणार असून टिटवाळा, श्रीमलंगगड या ठिकाणी देखील पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.