रिक्षास्टॅण्डच्या नावाखाली मोक्याच्या जागा जाहिरातदारांस १५ वर्षे आंदण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 01:06 AM2019-07-21T01:06:19+5:302019-07-21T01:06:38+5:30
खासगीकरणाचा असाही कट । महापालिकेचे कोट्यवधींचे नुकसान
ठाणे : आधीच शहराच्या विविध भागांत उभारण्यात येत असलेल्या ठिकाणी जाहिरातींचे हक्क प्रदान करून पालिकेने अनेक जागा मोफत स्वरूपात अनेक जाहिरातदारांना आंदण दिल्या आहेत. असे असताना आता महापालिका आता २५ ठिकाणी रिक्षास्टॅण्ड उभारण्याकरिता नगरसेविका परिषा सरनाईक यांच्या विहंग चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेसोबत मे. शुभांगी अॅडव्हर्टायझिंग अॅण्ड मार्केटिंग कंंपनीला १५ वर्षांकरिता या मोक्याच्या जागा देणार आहे.या स्टॅण्डच्या दर्शनी भागावर जाहिरातींचे हक्क एजन्सीला देण्यात येणार असून त्यातून महापालिका केवळ जाहिरात फीच वसूल करणार आहे. त्यामुळे बसथांबे, शौचालये, विजेचे पोल यापाठोपाठ आता रिक्षास्टॅण्डचे एक प्रकारे खासगीकरण करून पुन्हा जाहिरातदारांची खळगी भरण्याचा महापालिका प्रशासनाचा कट असल्याचा आरोप होत आहे.
यासंदर्भातील प्रस्ताव येत्या बुधवारच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. विहंग चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था सध्या लोकोपयोगी उपक्रमांतर्गत कर्करोगासारख्या आजारावर उपचार करण्यासाठी गरजूंना विशेषत: रिक्षाचालकांना आर्थिक मदत करत आहे. त्यानुसार, मे. शुभांगी अॅडव्हर्टायझिंग अॅण्ड मार्केटिंगच्या मदतीने ही सर्व सोयीसुविधायुक्त स्टॅण्ड उभे राहिल्यास त्याठिकाणी दुपारच्या वेळेस भोजन करण्याबरोबरच रिक्षाचालकांना थोडी विश्रांतीही मिळेल, असे भासवून ही परवानगी या संस्थेने मागितली आहे. संस्थेचा उद्देश चांगला असला, तरी जाहिरातीपोटी मिळणारे उत्पन्न हे कोट्यवधींच्या घरात आहे. त्यातून किती रिक्षाचालकांना खरोखरच याचा फायदा होईल, हे सांगणे कठीण आहे.
या प्रत्येक रिक्षास्टॅण्डवर १५ बाय ६ मोजमापाचा १ व ४ बाय ६ मोजमापाचा एक जाहिरात फलक लावण्यास परवानगी देऊन मोक्याच्या जागा १५ वर्षे जाहिरातदारांच्या घशात घालण्याचा कट प्रशासनाने रचला आहे. यामधून केवळ जाहिरात फीच वसूल केल्याने महापालिकेचे कोट्यवधींचे नुकसान होणार असून यातून संस्था किती नफा कमावणार, याचा साधा उल्लेखही नसल्यामुळे या प्रस्तावावरूनही महासभेत वादंग होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
या मोक्याच्या जागा जाणार जाहिरातदारांच्या घशात
यानुसार शहरातील वृंदावन, मानपाडा, कॅडबरीनाका, माजिवडानाका, गांधीनगर, खेवरा सर्कल, टिकुजिनीवाडीस बाळकुमनाका, कोलशेत हायलॅण्ड स्प्रिंग प्रोजेक्ट, कासारवडवलीनाका, स्वस्तिक प्लाझा, कोरम मॉल, माजिवडा लोढा रुस्तमजी रोड, आर मॉल घोडबंदर, तीनहातनाका, इटर्निटी मॉल, पाचपाखाडी, हरिनिवास सर्कल, ब्रह्मांड सर्कल, हिरानंदानी इस्टेट, वाघबीळ जंक्शन, खोपट, तीनहातनाका टिपटॉप प्लाझाजवळ अशा तब्बल २५ मोक्याच्या ठिकाणी महापालिका या संस्थेला जागा उपलब्ध करून देणार आहे.