ठाणे : शौचालय उभारून त्यावर जाहिरातफलक उभारण्याच्या प्रस्तावाला ठेकेदारांकडूनच अनेक ठिकाणी हरताळ फासण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. बाळकूम, मानपाडा परिसरात संबंधित ठेकेदारांनी शौचालयांचे काम पूर्ण होण्याआधीच येथे जाहिरातफलक उभारले असून प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
मूळ प्रस्तावावनुसार शौचालयाचे काम पूर्ण झाल्यानंतरच तेउभारण्याची अट असताना अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ठेकेदारांवर प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत ठाणे शहरात वातानुकूलित शौचालय बांधून त्यावर संबंधित जी एजन्सी शौचालय बांधून देईल तिला शौचालयाच्यावर जाहिरातफलक लावण्याचे अधिकार दिले आहेत. यापूर्वी झालेल्या महासभेत या प्रस्तावाला मंजुरीदेखील मिळाली आहे. त्यानुसार शहरात अशाप्रकारच्या शौचालयांची कामे करण्यात आली असून काही ठिकाणी तीसुरु आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वीच महासभेत शहरात सुरू असलेल्या शौचालयांच्या कामावरून मोठा वादंग झाला होता. ज्या ठिकाणी शौचालय बांधण्याच्या जागा निश्चित केल्या होत्या त्या बदलल्या असल्याचा आरोप त्यावेळी नगरसेवकांनी केला होता. तर काही ठिकाणी चक्क फुटपाथवर शौचालय बांधल्याचेही सभागृहाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. ही सर्व कामे थांबवण्याच्या सूचनादेखील यावेळी नगरसेवकांनी दिल्या केल्या होत्या. मात्र, त्यावर प्रशासनाने कोणत्याच प्रकारच्या हालचाली अद्याप केलेल्या नाहीत. या प्रस्तावानुसार स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत शहरात ३० ठिकाणी वातानुकूलित शौचालय बांधण्यात येणार आहे.बाळकूम आणि मानपाडा परिसरात शौचालयाचे काम पूर्ण झाले नसताना ज्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे त्याच्या बाजूला माउंटिंग बांधून त्यावर जाहिरातफलक आधीच उभारल्याची माहिती मनसेचे प्रभाग अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी उघड केली आहे. त्यामुळे काम पूर्ण होण्याच्या आधीच जाहिरात लावणाºया संबंधित ठेकेदारांवर कारवाइची मागणी त्यांनी केली आहे . यासंदर्भात महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांच्याशी संपर्क साधल्यानंतर असा प्रकार जर घडला असेल तर त्यावर निश्चित कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.