दुरुस्तीच्या नावाखाली ‘गडकरी’त आसनांअभावी ज्येष्ठांची परवड; नाट्यरसिक नाराज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 12:34 AM2021-03-25T00:34:04+5:302021-03-25T00:34:22+5:30

ठाणे शहराच्या मध्यभागी असलेले गडकरी रंगायतन १९७९ साली सुरू झाले. त्याच्या दोन-तीन वर्षांत ज्येष्ठ नागरिकांना प्रेक्षागृहाबाहेर सोफ्यांची व्यवस्था केली

Affordability of seniors due to lack of seats in Gadkari in the name of repairs; Theatrical annoyed | दुरुस्तीच्या नावाखाली ‘गडकरी’त आसनांअभावी ज्येष्ठांची परवड; नाट्यरसिक नाराज 

दुरुस्तीच्या नावाखाली ‘गडकरी’त आसनांअभावी ज्येष्ठांची परवड; नाट्यरसिक नाराज 

Next

ठाणे: ठाणे शहराचे भूषण असलेले गडकरी रंगायतनच्या आवारात दुरुस्तीच्या नावाखाली ज्येष्ठांसाठी वर्षानुवर्षे असलेली आसनव्यवस्था काढण्यात आली आहे. त्यामुळे नाटकांसाठी येणाऱ्या विशेषत: ज्येष्ठ मंडळींची या आसनव्यवस्थेअभावी परवड होत आहे. यामुळे  किमान खुर्च्या ठेवून तरी पर्यायी व्यवस्था करण्याची आग्रही मागणी ठाण्यातील ज्येष्ठ नाट्य रसिकांनी केली आहे.

ठाणे शहराच्या मध्यभागी असलेले गडकरी रंगायतन १९७९ साली सुरू झाले. त्याच्या दोन-तीन वर्षांत ज्येष्ठ नागरिकांना प्रेक्षागृहाबाहेर सोफ्यांची व्यवस्था केली, तसेच रंगायतनच्या आवारात सुरुवातीच्या काळात लोखंडी बाकांची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर ती काढल्यानंतर लोखंडी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली. नाट्यगृहात आल्यावर ज्येष्ठांना ताटकळत उभे राहायला लागू नये, तसेच मध्यंतर झाल्यावर त्यांना चहा किंवा इतर खाद्यपदार्थ बसून खाता यावेत यासाठी रंगायतनच्या आवारात आणि प्रेक्षागृहाच्या बाहेर आसनव्यवस्था केल्याचे येथील जाणकार आणि जुनी जाणती मंडळी यांनी सांगितले; परंतु लॉकडाऊननंतर ५० टक्क्यांच्या आसनक्षमतेच्या अटीने नाट्यगृह सुरू झाले, तेव्हापासून ही आसनव्यवस्थाच नसल्याची नाराजी ज्येष्ठांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. खुर्च्याही नाहीत आणि सोफेही नाहीत, त्यामुळे बसणार कुठे, हा प्रश्न त्यांनी केला आहे. तर दुरुस्तीसाठी ही आसनव्यवस्था काढल्याचे पालिका सांगत असेल तर पर्यायी व्यवस्था का केली नाही? दुरुस्तीसाठी तीन महिने लागतात का? असे सवालही त्यांनी केले आहेत. नाटकांसाठी रसिक वर्ग हा अर्धा तास आधी येऊन उपस्थित असतो. त्यामुळे त्यात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची व्यवस्था नसल्याने त्यांची परवड होत असल्याची खंत इतर रसिक वर्ग आणि कलाकारांनीही व्यक्त केली आहे.

रंगायतनमधील ज्येष्ठांसाठी असलेली आसनव्यवस्था कोरोना काळातच काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना बसायला जागा नाही. नाटकांसाठी येणारी ज्येष्ठ मंडळी ही मध्यंतर झाल्यावर आणि नाटक सुरू होईपर्यंत बसणार कुठे? आणि पालिका दुरुस्तीसाठी आसनव्यवस्था काढण्यात आल्याचा दावा करीत असेल तर पर्यायी व्यवस्था म्हणून इतर खुर्च्या लावाव्यात.- दुर्गेश आकेरकर, कलाकार

प्रेक्षागृहाबाहेर असलेले सोफे आणि रंगायतनच्या आवारातील खुर्च्यांची दुरुस्ती सुरू आहे. - भालचंद्र घुगे, व्यवस्थापक, गडकरी रंगायतन

Web Title: Affordability of seniors due to lack of seats in Gadkari in the name of repairs; Theatrical annoyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.