महापौरांविरोधात पुन्हा तरुण तुर्कांची आघाडी, निकालानंतर पुन्हा हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 07:16 AM2017-12-01T07:16:02+5:302017-12-01T07:16:10+5:30

अभ्यासू आणि अनुभवी म्हणून ज्यांचा गौरव होतो, ते कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा निकाल गुरूवारी कल्याण सत्र न्यायालयाकडून येताच शिवसेनेतील तरूण तुर्क नव्याने सरसावले आहेत.

 Against the Mayor, the leadership of the young Turks, the movement again after the results | महापौरांविरोधात पुन्हा तरुण तुर्कांची आघाडी, निकालानंतर पुन्हा हालचाली

महापौरांविरोधात पुन्हा तरुण तुर्कांची आघाडी, निकालानंतर पुन्हा हालचाली

googlenewsNext

कल्याण : अभ्यासू आणि अनुभवी म्हणून ज्यांचा गौरव होतो, ते कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा निकाल गुरूवारी कल्याण सत्र न्यायालयाकडून येताच शिवसेनेतील तरूण तुर्क नव्याने सरसावले आहेत. देवळेकर यांची महापौरपदाची दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. सहा महिन्यांनी व्यक्ती बदलणारच असेल तर ती आताच बदलावी, असा त्यांचा आग्रह आहे. त्यासाठी त्यांनी जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे बाजू मांडण्याची तयारीही सुरू केल्याचे वृत्त आहे.
पुढील अडीच वर्षाच्या कार्यकाळातील एक वर्षे भाजपाला संधी मिळणार आहे, तर दीड वर्षे शिवसेनेच्या वाट्याला येईल. ते दीड वर्ष आणि आताचे सहा महिने असा दोन वर्षाचा कार्यकाल मिळावा. त्यातही तो डोंबिवलीच्या वाट्याला यावा, यासाठी तरूण नेत्यांचे तरूण नेत्यांमार्फत प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येते. या आधीही देवळेकर यांच्याविरोधात मोहीम उघडण्यात आली होती. पण अन्य पदे देऊन विरोधी गटाचे समाधान करण्यात आले. मात्र न्यायालयाच्या निकालानंतर पुन्हा या गटाने उचल खाल्ली असून त्यांनी त्यासाठी संपर्कासही सुरूवात केल्याची चर्चा शिवसेनेच्या वर्तुळात आहे.
अभ्यासू नगरसेवक अशी देवळेकर यांची ख्याती आहे. महापालिकेत आघाडीची सत्ता असताना त्यांना स्थायी समितीचे सभापतीपद मिळाले होते. २००९ मध्ये शिवसेनेने त्यांना आमदारकीसाठी संधी दिली होती. मात्र तेव्हा मनसेचे प्रकाश भोईर यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. शिवसेनेतील अंतर्गत नाराजी त्यांना भोवल्याचे सांगितले जात होते. तसेच भाजपच्या बंडखोर अपक्षाने देवळेकरांचा विजय रोखला होता. २०१० च्या निवडणुकीनंतर देवळेकर महापौरपदासाठी इच्छुक होते. पण त्यांना २०१५ मध्ये संधी देण्यात आली. त्यावेळीही महापौरपदाच्या स्पर्धेत अनेक जण होते. पण अनुभव, आधी नाकारलेली संधी याचा विचार करून आणि एकनाथ शिंदे यांच्याशी असलेल्या संबंधांचा विचार करून त्यांना संधी मिळाली. मात्र त्याचकाळात २७ गावे महापालिकेत आल्याने महापालिकेच्या आर्थिक स्थितीची कोंडी झाली. त्यातून कोलमडत गेलेल्या व्यवस्थेचा आधार घेत पक्षातीलच तरुणांचा गट तरूण नेत्याच्या पाठिंब्यावर सक्रीय झाला आणि त्यांनी देवळेकर यांना हटविण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू केली. त्यांचा राजीनामा घेतला जाणार, असे बोलले जाऊ लागले. हा वाद वाढत गेल्यावर पालकमंत्र्यांनी त्यांची कानउघाडणी केल्याचे सांगण्यात आले. पण त्याचा देवळेकर यांनी इन्कार केला.
महापौर म्हणून काम करताना देवळेकर विश्वासात घेत नाहीत, असा आक्षेप घेण्यात आला होता. त्यांच्यासोबत आणि बैठकांना केवळ गटनेते रमेश जाधव आणि सभागृह नेते राजेश मोरे असतात. त्यामुळे महापालिकेतील ‘थ्री आर’ असे त्यांचे नामकरणही करण्यात आले होते. त्यातच महासभेत बोलू न दिल्याचा, अधिकाºयांना पाठिशी घातल्याचा मुद्दा पुढे करण्यात आला. विश्वासात घेतले जात नसल्याचा मुद्दा नगरसेविकांनी राज्याच्या समितीपुढे मांडल्यानंतर त्यांचा ‘बोलविता धनी’ कोण याचीही चर्चा रंगली. पण प्रत्येकाचे प्रत्येकवेळी समाधान करणे शक्य नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले होते. त्यातच एका तरुण नेत्याने महापौरांचा राजीनामा घेण्यासाठी थेट मातोश्रीपर्यंत फिल्डींग लावली आणि महापौर बदलण्याचे आश्वासन पदरात पाडून घेतल्याचे सांगितले जाऊ लागले. पण बदल झाला नाही.
आता उरलेले सहा महिने पूर्ण करण्यापूर्वीच देवळेकर यांच्या नगरसेवकपदाच्या वैधतेचा मुद्दा चर्चेत आला आहे.

एकाच गटावर मेहेरनजर नको

सध्या कल्याण-डोंबिवलीत पदे देताना एकाच गटावर मेहेरनजर झाल्याचे चित्र आहे. त्याबद्दल शिवसेनेतील नाराजीही समोर आली होती. एका व्यक्तीकडे किती पदे असावीत, हा मुद्दाही मांडला गेला होता. पण त्यावर काहीही निर्णय झाला नव्हता. त्यामुळे आता पदे देताना एका गटाचेच वर्चस्व निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी ही मागणीही पुढे आली आहे.

‘गोल्डन गँग’चे काय? : शिवसेनेतील तरूण नेता हा पालिकेतील गोल्डन गँगचा सूत्रधार असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी नागरिकांसमोर केला होता. त्यानंतर आजतागायत शिवसेनेने त्याबाबत भूमिका मांडलेली नाही की त्या नेत्याला आवरण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे आता मोहीम उघडणाºया तरूण तुर्कांची या प्रश्नामुळे अडचण होण्याची शक्यता आहे.

शिवसेना-भाजपाच्या कुरघोडीतील कोंडीचे खापर त्यांच्यावर फोडण्यात आले. देवळेकरांविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणारे भाजपाचे पराभूत उमेदवार अर्जुन म्हात्रे हे भाजपा नगरसेवक दया गायकवाड यांचे निकटवर्तीय व सहयोगी आहेत. गायकवाड हे देवळेकर यांचे विरोधक मानले जातात. त्यांनी तसा उघडपणे कधी विरोध केलेला नाही.

Web Title:  Against the Mayor, the leadership of the young Turks, the movement again after the results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.