डोंबिवली- मराठीला अभिजात दर्जा द्यावा, ही मागणी प्रलंबित आहे. त्यातील अडसर दूर झाले आहेत. दर्जा दिला हे सरकारकडून जाहीर होणे अद्याप बाकी आहे. बडोदा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास पंतप्रधान नरेंद्र मोदी येणे अपेक्षित आहे. त्यांच्याच करवी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला जाण्याची घोषणा बदोद्याच्या संमेलनात केली जाऊ शकते असा विश्वास मराठी साहित्यातील ज्येष्ठ अनुवादक व साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदाच्या रिंगणातील उमेदवार रविंद्र गुर्जर यांनी येथे व्यक्त केला आहे.बडोदा येथे होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमदेवार यांनी आज डोंबिवलीतील मतदारांची भेट घेतली. यावेळी गुर्जर बोलत होते. डोंबिवतीतून पाच मतदार असून त्या मतदारांचा गुर्जर यांना पांठिबा असल्याचे गुर्जर यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी संमेलनाध्यक्ष गुलाब वझे, मसाप उपाध्यक्ष सुरेश देशपांडे, जालिंदर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
देशपांडे म्हणाले, मराठी भाषेला अभिजात दर्जा जाहीर झाल्यावर मराठी भाषा संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून वर्षाला १०० कोटी रुपये मिळतात. मराठी भाषेचे एक स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणे, भाषेच्या विकासासाठी प्रकाशन, सेमिनार घेणे त्यासाठी आवश्यक फंड मिळतात. यावर काही गोष्टी मी नंतर सूचविणार आहे.
ललित वाड्मय पुस्तक विक्रेत्यांची संख्या घटली...ललित वाड्मय पुस्तक विक्रेत्यांची संख्या पूर्वी ४० होती ती आता १० वर आली आहे. धार्मिक पुस्तकांची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. पूर्वीच्या काळी चार विक्रेते १०० पुस्तक प्रती घेत असत. त्यामुळे एक हजारांमधील ४०० प्रती हातोहात विकल्या जात होत्या. आता नवीन पुस्तक काढले तर विक्रेते दोन पुस्तके घेतात त्यांचे पैसे ही तीन महिन्यांनी मिळतात. पुस्तक प्रदर्शनेही आता संपुष्टात आली आहेत. कारण त्यांचा खर्च निघत नाही यासगळ्यावर उपाय शोधणे गरजेचे आहे असल्याचे मत गुर्जर यांनी व्यक्तक केले.
प्रिंट ऑन डिमांडचा उपाययासाठी प्रिंट ऑन डिमांड हा एकमेव उपाय आहे. या प्रकारला येऊन चार ते पाच वर्षे झाली. या योजनेत अगदी एक प्रत ही छापता येते. परदेशातील व मोठे प्रकाशक २५ प्रती प्रथम छापतात. त्या प्रती मुख्य विक्रेत्याकडे पाठवितात. त्यानंतर विक्रेत्यांच्या मागणीनुसार प्रती छापल्या जाऊ शकतात. एखादी व्यक्ती आपले अनुभव जगापुढे मांडण्याची इच्छा असते. अश्या व्यक्ती १०० प्रति छापून त्या नातेवाईकांना वाटू शकतात. २०० रूपयांपर्यंतची पुस्तके या योजनेत परवडू शकतात. अॅमेझॉनवर स्वत:पुस्तक प्रकाशित करू शकतो. पुस्तक तयार करायचे. त्यांचे डीटीपी, मुखपृष्ठ आपण स्वत:चा करायचे. ते वेबसाईटवर टाकायचे. किंमत स्वत: ठरवायची. प्रकाशक म्हणून आपले नाव राहते. अॅमेझॉनद्वारे त्यांची विक्री होते. छापील ऑर्डर आली तर ते छापून देतात. ते त्या पुस्तकांची ५० टक्के रॉयल्टी आपल्याला देतात. या योजनेत ही आपण पुस्तके विकू शकतो. ही पध्दत रूजायला ४ ते ५ वर्षे लागतील, याकडे गुर्जर यांनी लक्ष वेधले आहे.
अनुवादकांची संख्या वाढली...आपल्याकडे हातात पुस्तके घेऊन वाचायची सवय आहे. पण तरूणपिढी ईबुक्सकडे वळत आहे. १९७५ साली ४ ते ५ अनुवादक होते. आता अनुवादक ४० ते ५० आहेत. उत्तम अनुवादक कमी आहेत. चांगले अनुवादक निर्माण करणे हे एक आमचे उद्दिष्टय आहे. काही दिवसांपूर्वी महामंडळाने अनुदान दिले. त्यावर साहित्य परिषदेतर्फे अनुवादक कार्यशाळा घेण्यात आली होती. २०० जणांनी त्याला प्रतिसाद दिला. बेसिक नॉलेज अनुवादकसंदर्भ घेऊन ५०० अनुवादक निर्माण करायचे आहेत. मराठी संस्थांची माहिती एकत्रित करणार आहे असे गुर्जर यांनी सांगितले.
लेखकांच्या रॉयल्टीवर जीएसटी लागू नकोमहाराष्ट्रात साधारणपणे १०० विविध प्रकारची संमेलनने होतात. त्यांची माहिती एकत्र करणार आहे. साहित्य व्यवहार वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे. लेखकांच्या रॉयल्टीवर सरकारने सध्या जीएसटी लागू केला आहे. त्याला उत्पन्न किती मिळणार त्यात जीएसटी द्यायचा. तो कमी करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी ऑनलाईन पिटीशन केली आहे. जीएसटी कमी केला तर चांगले आहे. मी निवडून आलो नाही तरी ही सर्व कामे मी करणार असल्याचे गुर्जर म्हणाले.
घटना दुरुस्ती करुन मतदारांची संख्या वाढविणे गरजेचेकेवळ १०६९ मतदार मतदान करतात. त्यामुळे घटना दुरूस्ती होऊन मतदारांची संख्या वाढणे गरजेचे आहे. किमान ५ ते ६ हजार मतदारांना मतदानांचा अधिकार असला पाहिजे. त्यासाठी पात्रिका पाठविताना खर्च वाढेल पण निवडणूकीत त्यामुळे चुरस निर्माण होईल. निवडणूक बिनविरोध होता कामा नये. पूर्वी अध्यक्षपदांसाठी उमदेवार लायक आहे की नाही हे पाहिले जायचं पण आता तसे होत नाही. कुणीही उमदेवारी घेऊ शकतो. आतापर्यंत अनुवादक हा संमेलनाध्यक्ष झाला नाही. प्रथमच एका अनुवादकाला संधी मिळणार आहे. १० ते १५ वर्षापूर्वी अनुवादाला प्रतिष्ठा नव्हती. आता परिस्थिती बदली आहे. ५० टक्के पेक्षा जास्त वाचक अनुवादक पुस्तके मागतात. त्यामुळे अनुवादक पुस्तकांना मागणी वाढत आहे. संमेलनाध्यक्ष ही अनुवादक व्हावा ही इच्छा आहे. आपल्या यशाची ९९ टक्के खात्री असल्याचे गुर्जर यांनी सांगितले.