आधीच कोरोनाची भीती, त्यात बेघर होण्याचे संकट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 12:51 AM2020-03-20T00:51:56+5:302020-03-20T00:54:07+5:30
एकीकडे कोरोनामुळे भीतीचे सावट असताना दुसरीकडे या घरांमध्ये राहणाऱ्यांवर बेघर होण्याचे संकट उभे राहिले आहे. यात प्रशासन आणि रहिवासी यांच्यात संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.
डोंबिवली - ठाकुर्ली उड्डाणपूल परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी तेथील लगतचे रस्ते रुंद करण्याची कार्यवाही केडीएमसीकडून होणार आहे. त्या अंतर्गत रस्त्यालगतच्या वसाहतींमधील २० घरांवर हातोडा पडणार आहे. त्यासंदर्भात महापालिकेकडून संबंधित बांधकामधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. एकीकडे कोरोनामुळे भीतीचे सावट असताना दुसरीकडे या घरांमध्ये राहणाऱ्यांवर बेघर होण्याचे संकट उभे राहिले आहे. यात प्रशासन आणि रहिवासी यांच्यात संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.
कोपर उड्डाणपूल दुरुस्तीसाठी बंद असल्याने पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी एकमेव पर्याय असलेल्या ठाकुर्ली उड्डाणपुलावर वाहतुकीचा ताण वाढला आहे. या ठिकाणी वाहतूक वाढल्याने येथील काही रस्त्यांवरील वाहतूक एकदिशा केली आहे, तर काही ठिकाणी सम-विषम (पी १, पी २) पार्किंगची अंमलबजावणीही सुरू आहे.
सात महिन्यांपूर्वी केडीएमसीचे तत्कालीन आयुक्त गोविंद बोडके यांनी या परिसराची पाहणी केली होती. या वेळी येथील वाहतूक व्यवस्था व नियोजनाच्या अनुषंगाने केलेल्या पाहणीदौºयात बेकायदा पार्किंग बंद करून रस्ते रुंद करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यानुसार अधिकाºयांनी ठाकुर्ली उड्डाणपुलालगतचे पूर्वेकडील संभाजी पथ आणि छेडा क्रॉस रोड रुंदीकरणाची कार्यवाही सुरू केली होती. या रुंदीकरणासाठी घरे व अन्य बांधकामांवर मार्किंग करण्यात आले. हे दोन्ही रस्ते मंजूर विकास आराखड्यानुसार नऊ मीटरचे आहेत. हे पाहता यात इमारतींच्या संरक्षक भिंतींसह दोन्ही रस्त्यांच्या मध्यावर असलेल्या वसाहतीमधील २० घरांवरही रुंदीकरणामुळे हातोडा पडणार आहे. मात्र, या रुंदीकरणाला त्या वेळी स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध केला होता. जर घराच्या बांधकामाला हात लावला तर विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालू, असा आक्र मक पवित्रा घेतला होता; परंतु बोडके यांच्या दौºयानंतर रुंदीकरणाची कार्यवाही केवळ नोटीस बजावण्यापुरतीच राहिली.
मात्र, आता पुन्हा ठाकुर्ली उड्डाणपूल परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी तेथील रस्ते रुंदीकरणाचे प्रयत्न केडीएमसी प्रशासनाने सुरू केले आहेत. रुंदीकरणाला रहिवाशांचा विरोध आजही कायम आहे.
वाहतूककोंडीच्या प्रश्नाला प्रशासनाचा नियोजनशून्य कारभारच कारणीभूत आहे. ठाकुर्ली उड्डाणपुलाचे नियोजनच चुकीचे झाले आहे. पुलाची एक बाजू जोशी हायस्कूलजवळ उतरविण्यात आली आहे. ती जागाच चुकीची आहे. याआधी कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्यावर पूल उतरविला जाणार होता; पण तेथील घरे वाचविण्यासाठी जोशी हायस्कूल परिसराचा घाट घालण्यात आला.
दरम्यान, आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवर पूल उतरविण्याआधी वाहतूककोंडी होणार, याची जाणीव प्रशासनाला झाली नव्हती का? असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे. आम्ही ६० ते ७० वर्षांपासून येथे राहत आहोत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
केडीएमसीचे ‘फ’ प्रभाग अधिकारी राजेश सावंत यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता, आयुक्तांच्या आदेशानुसार मंजूर विकास आराखड्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्याआधारे रस्ता रुंदीकरणात येणाºया घरांना नोटिसा पाठवल्याचे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.