बदलापूर/अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही पालिका ‘अ’ वर्ग गटात मोडत असल्याने या दोन्ही पालिकांच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग आणि वॉर्ड रचना करण्याच्या अनुषंगाने कोकण भवन कार्यालयाने लोकसंख्येची माहिती मागवली आहे. तसेच या शहरातील एससी आणि एसटी समुदायाची लोकसंख्याही मागविण्यात आली आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शासकीय कामकाजाला सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर या दोन स्वतंत्र पालिकांची निवडणूक ही एप्रिलमध्ये घेण्यात येणार आहे. या निवडणुकीत नवीन नियमानुसार दोन वार्डाचा एक पॅनल तयार करून निवडणूक घेण्यात येणार आहे. मात्र, शासन बदलल्याने नव्या शासनाने पॅनल पद्धत बंद केल्यास पुन्हा एक वार्डनिहाय निवडणूक घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणूक ही पॅनल पद्धतीने होणार की वार्ड रचनेनुसार होणार याबाबत संभ्रम कायम आहे. शासनाने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नसल्याने कोकण विभागीय कार्यालयाने निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला सुरुवात केली आहे.
पॅनल पद्धतीने निवडणूक घेण्याचा निर्णय झाल्यास नवीन वार्ड रचना करून त्या माध्यमातून पॅनल तयार करावे लागणार आहे. त्यामुळे परिसरातील लोकसंख्या आणि त्या अनुषंगाने नकाशे मागवण्यात आले आहे. सध्याची लोकसंख्या पाहता पालिकेची माहापालिका होणे अपेक्षित आहे. मात्र, महापालिकेसाठी जी लोकसंख्या अपेक्षित आहे ती लोकसंख्या जनजनणेआधारावर गृहीत धरत आहे. पालिकेची निवडणूक ही २०२० मध्ये होणार असल्याने २०२१च्या जनजणनेनुसारच भविष्यात पालिका होणार आहे. मात्र, २०२० मध्ये होणारी निवडणूक ही पालिकेचीच होणार हे निश्चित झाले आहे. त्या अनुषंगाने प्रभाग, वार्ड रचना तयार करण्यासाठी कामकाज सुरू झाले.
शासन निर्णयाकडे लागले लक्ष
बदलापूर पालिकेनेही शहराची एकूण लोकसंख्या आणि अस्तित्वातील प्रभागांची लोकसंख्येचा अहवाल सादर केला आहे. सोबत शहरातील अनुसूचित जाती आणि जमातीचीही लोकसंख्या सादर केली आहे. अशाच प्रकारची माहिती अंबरनाथ पालिकेनेही कोकण भवन कार्यालयात सादर केली आहे.
निवडणुकीच्या अनुषंगाने कामकाज सुरू झाले असून आता केवळ शासन निर्णयाची प्रतीक्षा केली जात आहे. आगामी निवडणूक ही प्रभागनिहाय घेणार की वार्ड रचनेनुसार घेणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे शासनाचा निर्णय येत नाही तोवर सर्व प्रस्ताव तयार करून ठेवण्याच्या अनुषंगाने कामकाज सुरू केले आहे.