ठाणे प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अंबरनाथ रायझिंग
By प्रज्ञा म्हात्रे | Published: May 5, 2024 04:29 PM2024-05-05T16:29:15+5:302024-05-05T16:29:25+5:30
नियमित डावात उभय संघ १५१ धावांवर बरोबरीत राहिले.
ठाणे : नियमित डावानंतर सुपर ओव्हरमध्येही बरोबरी झाल्याने सर्वाधिक चौकरांमुळे अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबने फटीएल एकादश संघावर सरशी मिळवत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित ठाणे प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले. नियमित डावात उभय संघ १५१ धावांवर बरोबरीत राहिले. त्यानंतर ही बरोबरी सुपर ओव्हरमध्ये १० धावांवर कायम राहिल्याने दोन्ही डावात मिळून एकूण २२ चौकार मारणाऱ्या अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबला विजयी घोषित करण्यात आले. कमनशिबी ठरलेल्या एफटीएल एकादश नावावर १८ चौकार जमा होते.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या एफटीएल एकादश संघाला सुर्यांश शेडगे(७७), यतीन मढवी(३२) आणि अर्जुन थापाने २० धावा करत एफटीएल एकादश संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. या डावात सौद अंसारीने सहा, परिक्षित वळसंगकरने दोन आणि प्रथमेश महालेने एक बळी मिळवला. त्यानंतर अनिल रोनंकी ने ३३ आणि परिक्षित वळसंगकरने ६१ धावांच्या धडाकेबाज खेळीने अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबला बरोबरी साधून दिली. या डावात सुर्यांश शेडगेने दोन बळी मिळवले. सुपर ओव्हरमध्ये अर्जुन थापाच्या सात धावांमुळे एफटीएल एकादश संघाला १० धावा जमवता आल्या. परिक्षितने ९ धावा करत संघाला विजयाच्या समीप नेले.शेवटच्या चेंडूवर विजयासाठी दोन धावांची आवशयकता असताना फलंदाज धावचित झाल्याने सामन्यात पुन्हा बरोबरी झाली.
संक्षिप्त धावफलक : एटीपीएल एकादश : २० षटकात सर्वबाद १५१ ( सुर्यांश शेडगे ७७, यतीन मढवी ३२, अर्जुन थापा २०, सौद मंसूरी ४-२६-६, परिक्षित वळसंगकर ४-२४-२, प्रथमेश महाले ३-२७-१) बरोबरीत अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लब : २० षटकात ८ बाद १५१ ( परिक्षित वळसंगकर ६१, अनिल रोनंकी ३३, सुर्यांश शेडगे ४-३७-२, नविन शर्मा ४-३०-१, अजय पाटील ४-३७-१, विकास पाटील ४-२५-१, अक्ष शर्मा ४-२०-१),
सुपर ओव्हर : अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लब : एक षटकात २ बाद १० ( परिक्षित वळसंगकर ९, विकास पांडे १-१०-१) बरोबरीत एफटीएल एकादश : एका षटकात २ बाद १० ( अर्जुन थापा ७, परिक्षित वळसंगकर १-१०-१).