उल्हासनगर : महापालिकेच्या उपायुक्त पदी संजय गवस यांची नियुक्ती शासनाकडून झाली असून गवस यांचे आयुक्त अजीज शेख यांनी स्वागत केले. गेल्या आठवड्यात उपायुक्त अशोक नाईकवाडे व प्रियांका राजपूत यांची निवडणूक आचारसंहिता नियमानुसार बदली झाली आहे.
उल्हासनगर महापालिकेत वर्ग-१ व २ ची ८० टक्के पदे रिक्त असल्याने, लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्याकडे वर्ग-१ व २ च्या पदाचा पदभार द्यावा लागला आहे. त्यामुळे महापालिकेच्या बहुतांश विभागात सावळागोंधळ निर्माण झाला. निवडणूक आचारसंहिता नियमानुसार मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे व मालमत्ता कर विभागाच्या प्रियांका रजपूत यांची बदली झाल्याने, महापालिकेच्या कामाचा भार आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त सुभाष जाधव यांच्यावर पडला आहे. यादरम्यान संजय गवस यांची उपायुक्त पदी निवड झाल्याने, समाधान व्यक्त होत आहे.
महापालिकेत १ अतिरिक्त आयुक्त, २ उपायुक्त, ६ सहायक आयुक्त, शहर अभियंता, पाणी पुरवठा व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यासह बहुतांश महत्वाचे पदे रिक्त असून शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी येत नसल्याने, महापालिकेत गोंधळ निर्माण झाला. हजारो कोटीच्या निधीतून सुरू असलेल्या विविध योजनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकारी नसल्याने, योजनेच्या दर्जाबाबत टीका होत आहे. तसेच सफसफाईचा बोजवारा, अवैध बांधकामाचा सुळसुळाट, आरोग्याचा प्रश्न, उद्यानाची दुरवस्था, रस्त्याची दुरावस्था, पाणी टंचाई आदी समस्यांने नागरिक हैराण झाल्याचे बोलले जात आहे.