पोलीस आयुक्तालयाचा मंजुरी आदेश कागदावरच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 12:05 AM2019-09-17T00:05:24+5:302019-09-17T00:05:34+5:30
मीरा-भाईंदर महापालिका आणि वसई-विरार महापालिका क्षेत्रासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय करण्याचे २०१७ पासून प्रस्तावित होते.
मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिका आणि वसई-विरार महापालिका क्षेत्रासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय करण्याचे २०१७ पासून प्रस्तावित होते. मात्र, त्यासाठी अद्याप मुहूर्तच सापडला नव्हता. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या आयुक्तालयाचा शासन आदेश काढण्यात आला. असे असले तरी ते प्रत्यक्षात कधी सुरू होणार, याची माहितीच शासनाला देता आलेली नाही. तसेच आवश्यक इमारतीचाही थांगपत्ता नसल्याने ते आणखी किती वर्षे कागदावर राहणार, हे सध्या तरी गुलदस्त्यातच आहे.
ठाणे व पालघर जिल्ह्यांतील एकूण १३ पोलीस ठाणी आहेत. त्यात वसई-विरारमधील सात, तर मीरा-भार्इंदरमधील सहा पोलीस ठाणी आहेत. नव्याने मीरा-भार्इंदरमध्ये दोन, तर वसई-विरारमध्ये पाच अशी सात पोलीस ठाणी मंजूर केली आहेत. २०११ मध्ये दोन्ही महापालिकांची लोकसंख्या २० लाख ४६ हजार होती. २०१९ पर्यंत तीच लोकसंख्या अंदाजे ४४ लाख ६६ हजार इतकी झाली आहे. या भागांत गुन्ह्यांचे प्रमाणही तुलनेने जास्त आहे.
मीरा-भार्इंदरमधील काशिमीरा, मीरा रोड, नयानगर, नवघर, भार्इंदर व उत्तन अशी सहा पोलीस ठाणी यात आहेत, तर खारीगाव व काशिगाव ही दोन नव्याने प्रस्तावित केली आहेत. भार्इंदर पूर्वेला फाटकापासून विमल डेअरीपर्यंतची गोडदेवकडील बाजू, तर इंद्रलोकनाक्यावरून खाडीकिनाऱ्यापर्यंतची इंद्रलोककडील बाजू या नवीन पोलीस ठाण्यात असेल. तर, सध्याच्या नवघर पोलीस ठाण्याच्या असलेल्या टाटा डोकोमो शोरूमपासून पील हाइटपर्यंतची हद्द असेल. वास्तविक गोडदेव, गोल्डन नेस्ट वा इंद्रलोक असे नाव या प्रस्तावित पोलीस ठाण्याचे हवे असताना संबंध नसणाºया खारीगावचे नाव दिल्याने गैरसोयीचे ठरणार आहे.
काशिगाव या प्रस्तावित पोलीस ठाणे हद्दीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून हाटकेशपर्यंतच्या रस्त्याची उजवी बाजू आणि काशिमीरा पोलीस ठाण्यामागील रस्त्याची डाव्या बाजूपासून थेट घोडबंदर-काजूपाड्यापर्यंत काशिगाव पोलीस ठाण्याची हद्द असेल. तर, सध्याच्या उर्वरित मुंबईच्या दिशेकडील भाग काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत राहणार आहे. वसई-विरार हद्दीत सध्याच्या वसई, विरार, नालासोपारा, माणिकपूर, वालीव, अर्नाळा आणि तुळिंज या सात पोलीस ठाण्यांसह नव्याने पेल्हार, आचोळे, मांडवी, बोळिंज, नायगाव अशी पाच नवीन पोलीस ठाणी मंजूर केली आहेत. त्याची अधिसूचना वेगळी काढली जाणार आहे. सध्या तरी हे आयुक्तालय निव्वळ कागदावरच आहे. त्यामुळे निवडणुका समोर ठेवून पोलीस आयुक्तालय मंजुरीचा आदेश काढल्याची चर्चा आहे.
>अशी असेल आयुक्तालयाची रचना
पोलीस आयुक्त कार्यालयातच आयुक्तांसह अपर पोलीस आयुक्त, उपायुक्त (गुन्हे), उपायुक्त (मुख्यालय) यांची कार्यालये असतील. तीन उपायुक्तांची तीन पोलीस परिमंडळे असणार आहेत. परिमंडळ-१ मध्ये मीरा रोडमध्ये मीरा-भार्इंदरमधील सर्व पोलीस ठाणी येतील. परिमंडळ-२ हे वसईसाठी तर परिमंडळ-३ विरारसाठी असेल. दोन्ही जिल्ह्यांतील अधिकारी-कर्मचारी मिळून २,४८८ पदे आयुक्तालयात वर्ग करण्यासाठी मंजूर केली आहेत. तर, २,१६४ पदांपैकी पहिल्या टप्प्यामध्ये १०२२ पदे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे. दुसºया टप्प्यातील पदेनिर्मितीचा प्रस्ताव उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेनंतर पुढे कार्यवाहीचा निर्णय घेतला जाईल.पहिल्या टप्प्यातील १,०२२ पदांसाठी ९४ कोटी ६२ लाखांच्या खर्चास तर आयुक्तालय निर्माण करण्यासाठी ४३ कोटी ७९ लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी आहे. आयुक्तालय निर्माण खर्चात इमारत, वाहन, नवीन पोलीस ठाणी खर्च तसेच साधनसामग्री खर्चाचा समावेश आहे.