सखल भागातील नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता संक्रमण शिबिरांची व्यवस्था करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:06 AM2021-05-05T05:06:24+5:302021-05-05T05:06:24+5:30
कल्याण : येत्या पावसाळ्य़ात सखल भागात पाणी साचून नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता संक्रमण शिबिरांची व्यवस्था करण्यात यावी, असे आदेश महापालिका ...
कल्याण : येत्या पावसाळ्य़ात सखल भागात पाणी साचून नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता संक्रमण शिबिरांची व्यवस्था करण्यात यावी, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकारी वर्गास दिले आहेत.
आयुक्तांनी सोमवार सायंकाळी मान्सूनपूर्व आढावा बैठक घेतली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, शहर अभियंता सपना कोळी, पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता जयवंत ढाणो, पालिका सचिव संजय जाधव आदी या बैठकीस उपस्थित होते.
यावेळी आयुक्तांनी अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची माहिती घेऊन पावसाळ्य़ापूर्वी या इमारती रिकाम्या कराव्यात अशा सूचना दिल्या. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या जागेत डासांची उत्पत्ती होणार नाही यासाठी धूर आणि जंतुनाशक फवारणी करण्याचे आदेश घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांना दिले आहेत. लेप्टोस्पारोसस उद्भवू नये याकरिता झोपडपट्टी भागातील उंदरांची बिळे शोधून त्याठिकाणी औषध फचारणी केली जावी अशी सूचना आयुक्तांनी घनकचरा विभाग आणि साथरोग नियंत्रण अधिकाऱ्यांना केली. अतिवृष्टी आणि चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता इमारतीवरील धोकादायक होर्डिंग्ज काढण्यात यावेत. ही जबाबदारी मालमत्ता विभागाची असल्याचे नमूद केले.
खाजगी कोविड रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी. पावसाळ्य़ात या फांद्या वीजवाहिनीवर पडून रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित होऊ नये. पावसाळ्य़ापूर्वी रस्त्यावरील खड्डे भरणे, नालेसफाई करणे आवश्यक आहे. सखल भागातील चेंबरवरील प्लास्टिकची झाकणे काढून त्याठिकाणी सिमेंट काँक्रीटची झाकणे बसविण्यात यावीत. रिंग रोडच्या कामाच्या ठिकाणी वॉटर लॉगिंग होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता ढाणे यांना आयुक्तांनी दिली आहे. हीच सूचना रेल्वेचे एरिया ऑफिसर प्रमोद जाधव यांनाही केली.
---------------------------------