ठाणे : शौचालयाच्या खिडकीची जाळी उचकटून एमएक्स सिस्टीम्स, इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या गोदामातून तांब्याचे ३६ वॉल्व्ह चोरणा-या त्रिकुटाला ठाणे शहर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख ३२ हजार ४५२ रुपयांचे ३३ वॉल्व्ह हस्तगत केले. तसेच एकाची किंमत सात हजार ४४ रुपये इतकी असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.भिवंडीतील दापोडा येथे २ ते ४ नोव्हेंबरदरम्यान हा गुन्हा घडला होता. त्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी स्टोअर इन्चार्ज मयूर पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्ह्यातील आरोपींना पकडणे आणि चोरीस गेलेला माल मिळवणे हे पोलिसांपुढे एक मोठे आव्हान होते. घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेºयामधील फुटेज पाहून या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक आर.जे. व्हरकाटे करीत होते. त्यावेळी काल्हेर येथील वडापावविक्रेता अक्षय विश्वास पाटील (२३), ट्रान्सपोर्ट व्यावसायिक किशोर प्रदीप पाटील (२०) आणि भंगार व्यावसायिक नरेंद्र हरिश्चंद्र मिश्रा (४०) या तिघांना अटक केली. तसेच दोन अल्पवयीन बालकांनाही ताब्यात घेतले. त्यातील अक्षय आणि किशोर यांनी चोरलेले वॉल्व्ह नरेंद्र याला विकल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानुसार, त्यांच्याकडून ३३ नग हस्तगत केले. ही कारवाई भिवंडी परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे आणि सहायक पोलीस आयुक्त पूर्व विभाग नितीन कौसडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे, पोलीस उपनिरीक्षक आर.जे. व्हरकाटे यांनी केली.
तांब्याचे वॉल्व्ह चोरणाऱ्या त्रिकूटाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 5:04 AM