बदलापूर: आमदार म्हणून विकास कामांच्या बाबतीत आपण कोठेही कमी पडलो नसून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आपला सर्वतोपरी प्रयत्न सुरू असतो. एवढेच नव्हे तर त्या ठिकाणी निधी पुरवण्याचा आपला प्रयत्न असतो. मात्र आपण इतरांचा मतदारसंघात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करणे चुकीचे असून राज्याचा विधिमंडळाचा सदस्य या नात्याने मी कुठेही निधी मागू शकतो अशी ठाम भूमिका आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केली आहे. नुकत्याच झालेल्या ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत काही आमदारांनी किसन कथोरे यांच्यावर आक्षेप नोंदवला होता. तसेच कथोरे हे आपल्या मतदारसंघात देखील निधी मिळवण्यासाठी पत्र देत असल्यावर नाराजी व्यक्त केली होती.
याबाबत आमदार किसन कथोरे यांना विचारणा केली असता त्यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. मी केवळ आमदार नसून विधिमंडळाचा सदस्य या नात्याने राज्याच्या विकासाच्या अनुषंगाने काही निर्णय घ्यावे लागतात. या निर्णयाचा एक भाग म्हणून आम्ही सगळे आमदार आपापल्या मतदारसंघात विकास निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असतो. आपण मुरबाडमध्ये काम करीत असताना आपले कार्यकर्ते जर दुसऱ्या मतदारसंघात देखील निधी मागत असतील तर आपण तो निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे हे चुकीचे ठरत नाही. प्रत्येक आमदार हा आप आपल्या मतदारसंघात सक्षम असतो.
मात्र कार्यकर्ते आणि पक्ष सांभाळण्यासाठी जास्तीत जास्त निधी कसा मिळेल यासाठी प्रयत्न करणे चुकीचे नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आपण नसताना आपल्यावर हे आरोप झाले असल्याने आपण या क्षणाला काही बोलू शकत नाही. मात्र आपला हेतू कधीही चुकीचा नव्हता आणि चुकीचा राहणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली. विकास कामासाठी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी आला तरी आपण तो सर्वसामान्या नागरिक आहे असे समजूनच त्याच्यासाठी काम करतो आणि हे आमदार म्हणून आमची सर्वांची जबाबदारी असते. कोणा आमदारांना माझ्या कार्यशैलीवर आक्षेप असेल तर त्यांनी आपल्याशी संवाद साधला असता तर त्याचे योग्य समाधान आपण करू शकलो असतो असे त्यांनी व्यक्त केले.