कल्याण शहरातील डांबरी रस्त्यांची चाळण; वाहनचालकांची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 12:45 AM2020-08-02T00:45:16+5:302020-08-02T00:45:25+5:30
नागरिकांचे हाल । अंतर्गत, प्रमुख रस्ते झाले खड्डेमय; अपघात होण्याची व्यक्त होतेय भीती
कल्याण : केडीएमसी हद्दीतील अंतर्गत व प्रमुख रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यांतून वाट काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची भीती ते व्यक्त करत आहेत. कल्याण पूर्वेतून पश्चिमेला येणाऱ्या उड्डाणपुलावर तसेच वालधुनी परिसरातही रस्त्यांवर खड्डे आहेत. कल्याण बाजार समिती कार्यालयाकडे व एका मोठ्या रुग्णालयाकडे जाणाºया रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून, त्यात साचलेल्या पाण्यामुळे त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. उंबर्डे परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे रिक्षाचालक, दुचाकी, टेम्पो, ट्रकचालक यांना गाडी चालविणे कठीण झाले आहे. यंदा जुलैमध्ये जास्त पाऊस पडलेला नसतानाही रस्त्यांची चाळण कशी झाली, असा सवाल वाहनचालक करत आहेत.
मागच्या वर्षी जुलै, आॅगस्टमध्ये जोरदार अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे रस्ते पाण्यात वाहून गेले होते. यंदा पावसाचा पत्ताच नव्हता. चार दिवसांपूर्वी पाऊस पडला असून, त्यात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. स्थायी समितीने खड्डे बुजवण्यासाठी जवळपास आठ कोटी रुपये मंजूर केले आहेत. पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजविले गेले असताना पावसाळ्यात खड्डे पडले कसे, असा प्रश्न आहे. यासंदर्भात केडीएमसीच्या शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनी सांगितले की, चार दिवसांत पडलेल्या पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खड्डे बुजविण्याचे आदेश संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांना दिले असून, ते खड्डे बुजवण्याची कामे करणार आहेत.
१०० कोटींच्या निधीचा प्रस्ताव सरकारदरबारी पडून
मागच्या वर्षी पावसात २७ गावांतील रस्ते अतिवृष्टीत वाहून गेले होते. हे रस्ते दुरुस्त करण्यासाठी राज्य सरकारकडे ३२७ कोटींचा निधी मागितला होता. मात्र, तो निधी सरकारकडून मिळाला नाही. त्यात कोरोनाचे संकट सुरू झाले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिकेत जम्बो बैठक घेतली, तेव्हा १०० कोटी रुपयांचा निधी देण्याचे सूतोवाच केले होते. शहरातील रस्ते, सुशोभीकरण, स्वच्छता यासाठी हा निधी दिला जाणार होता. कोविड आपत्तीमुळे हा प्रस्ताव सरकारदरबारी पडून आहे.