साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे पुन्हा सेवेत हजर, ऑगस्टमध्ये फेरीवाल्यांकडून झाला हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 11:08 AM2021-12-02T11:08:52+5:302021-12-02T11:09:28+5:30
ठाणे महापालिकेच्या साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावर ३० ऑगस्ट रोजी फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी १ डिसेंबर रोजी त्या पुन्हा सेवेत हजर झाल्या. बुधवारी महापौर नरेश म्हस्के यांच्या दालनात त्यांनी उपस्थिती लावली.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावर ३० ऑगस्ट रोजी फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी १ डिसेंबर रोजी त्या पुन्हा सेवेत हजर झाल्या. बुधवारी महापौर नरेश म्हस्के यांच्या दालनात त्यांनी उपस्थिती लावली. यावेळी महापौरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ऑगस्ट महिन्यात कासारवडवली नाक्यावर सायंकाळी फेरीवाल्यांवर कारवाईसाठी त्या गेल्या होत्या. त्यावेळी एका फेरीवाल्याने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या हाताची दोन बोटे अक्षरश: तुटली तर त्यांच्या अंगरक्षकाचेही एक बोट तुटले. या घटनेचे तीव्र पडसाद अधिकारी वर्गामध्ये उमटले होते. या घटनेची दखल थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील घेतली. त्यानंतर त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. परंतु, त्यांची दोन बोटे जुळविण्यात अपयश आले. त्यातही रुग्णालयातून डिस्चार्ज होत असताना त्यांनी यापुढेही फेरीवाल्यांच्या विरोधातील ही कारवाई अशीच जोमाने सुरू ठेवणार असल्याचे सांगितले होते. तसेच हा हल्ला अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावरून झाल्याचे भाष्य त्यांनी केले होते. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची चिन्हे निर्माण झाली होती.
दरम्यान, आता तीन महिन्यांनंतर त्या पुन्हा सेवेत हजर झाल्या आहेत. त्यानुसार बुधवारी त्यांनी महापौर नरेश म्हस्के यांची भेट घेतली. यावेळी त्यांचा अंगरक्षकदेखील हजर होता. या दोघांच्या धाडसाचे कौतुक करण्याबरोबरच म्हस्के यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.