भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेची महासभा भाजपा सत्ताधा-यांच्या काळात गोंधळीच ठरू लागल्याने ८ डिसेंबरपासूनच्या पुढील महासभा व्यवस्थित होऊ द्या, असे म्हणण्याची वेळ सत्ताधारी भाजपावर आल्याने विरोधकांच्याही भुवया उंचावल्या आहेत. आ. नरेंद्र मेहता व महापौर डिम्पल मेहता यांनी बुधवारी सर्व गटनेत्यांची बैठक बोलवली असता त्यात विरोधकांना विनवणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.भाजपाने सेनेच्या हक्काच्या विरोधी पक्षनेतेपदावर गदा आणून ते अद्याप लटकत ठेवले आहे. त्यामुळे १६ सप्टेंबरपासूनच्या महाभसेत सेनेने गोंधळ घालून भाजपाच्या सुडाच्या राजकारणाला विरोध दर्शवला. त्यातच, ८ डिसेंबरच्या महासभेत महापौरांनी महत्त्वाकांक्षी ठरलेल्या एकमेव नाट्यगृहाची बांधकाम परवानगीच रद्द करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी आणला आहे. त्यामुळे सेना आक्रमक झाल्याने त्याची तक्रार आ. प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यामुळे ही महासभा वादळी ठरणार असल्याचे संकेत मिळाल्याने मेहता व महापौरांनी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलवली होती. त्यात शुक्रवारची महासभा शांततेत चालवण्याची विनंती विरोधकांना केल्याचे सांगण्यात आले. नाट्यगृहाच्या मुद्यावर बोलताना महापौरांनी, अनेक वर्षांपासून डी.बी. रिअॅलिटी या विकासकाने नाट्यगृहाचे बांधकाम सुरू केलेले नाही. यंदा त्याने डिसेंबर २०१८ पर्यंत नाट्यगृहाचे काम पूर्ण करण्याची मुदत दिली असून या मुदतीतही काम पूर्ण होणे शक्य आहे. त्यामुळेच त्याची बांधकाम परवानगी रद्द करून तो भूखंड पालिकेच्या ताब्यात घेण्याचा प्रस्ताव येत्या महासभेत आणल्याचा दावा केला. तरीही, विकासक निश्चित मुदतीत नाट्यगृह बांधणार असल्यास विकासकाने त्याची निश्चित मुदत आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्याकडे करार स्वरूपात द्यावी. तसेच या बांधकाम खर्चाची बँक गॅरंटीही विकासकाकडून घेतली जावी, जेणेकरून मुदतीत नाट्यगृहाचे बांधकाम पूर्ण न झाल्यास तो भूखंड पालिका ताब्यात घेऊन त्यावर बँक गॅरंटीच्या पैशांतून नाट्यगृह बांधेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. त्याला सेना, काँग्रेस गटनेत्यांनी सहमती दर्शवली. आता महासभेत काय होते, याकडे साºयांचे लक्ष आहे.
बाबांनो, महासभा सुरळीत होऊ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 12:44 AM