बदलापूर : बदलापूर नगरपालिकेच्या आर्ट गॅलरीमध्ये गणेशोत्सवानिमित्त रूप गणेशाचे हे चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात १२५ चित्रकारांनी आपल्या कुंचल्यातून साकारलेल्या गणेशाच्या विविध, मनमोहक कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. या भिन्न आणि सुंदर कलाकृती पाहण्यासाठी बदलापूरकर रसिकांनी आर्ट गॅलरीत गर्दी केली आहे. हे प्रदर्शन २५ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
बदलापूरच्या आर्ट गॅलरीमध्ये ‘रूप गणेशाचे’ प्रदर्शन भरविण्यात आले आहे. गणेश चतुर्थीनिमित्ताने चित्रकारांनी गणेशाचे विविध रूप कॅनव्हासवर साकारले. या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन राजेंद्र घोरपडे, योगेश गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात सहभागी चित्रकारांचा सन्मान करण्यात आला. चित्र-शिल्प, कोलाज, धातुकाम, मीनाकारी, कॅलिग्राफी, रेखाटने या विविध माध्यमांद्वारे गणरायाचे रूप रेखाटले गेले आहे. या प्रदर्शनात ज्येष्ठ आणि प्रसिद्ध चित्रकारांसह तरुण व नवोदित असे मिळून १२५ चित्रकारांचा समावेश आहे. चित्रकार संभाजी कदम, वासुदेव कामत, प्रतिभा वाघ, विजयराज बोधनकर आणि अनेक चित्रकारांनी या प्रदर्शनाला उपस्थित राहून या कलाकृती पाहिल्या. ही चित्रं फक्त महाराष्ट्रातील चित्रकारांची नसून भारतातील वेगवेगळ्या राज्यातील चित्रकारांनी ती काढून प्रदर्शनासाठी पाठविलेली आहेत. चित्रकारांसाठी रूप गणेशासारखे अनेक उपक्रम यापुढेदेखील सुरू राहणार असल्याची माहिती राजेंद्र घोरपडे यांनी दिली.
----------