बालेकिल्ल्यातच बाळासाहेब ठाकरेंची स्मारके रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 12:50 AM2019-11-10T00:50:32+5:302019-11-10T00:50:36+5:30
ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो.
ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यातही ठाणे आणि कल्याण-डोंबिवली या शहरांत गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर या महापालिकांतील सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या शहरांत बाळासाहेबांच्या कार्याची भावी पिढीला ओळख व्हावी, यासाठी त्यांची स्मारके बांधण्याचा निर्णय घेऊन त्यानुसार अर्थसंकल्पीय तरतूद करून कामाला सुरुवात केली. मात्र, गेल्या चार वर्षांपासून ही स्मारके रखडलेली असून येत्या १७ नोव्हेंबर रोजी येणाºया बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर स्मारकांमधील ही दिरंगाई त्यांचे सैनिक कशी खपवून घेत आहेत, असा सवाल आहे.
ठाणे : ठाण्यात २०१५ पासून काम कूर्मगतीने तीनहातनाका येथील इटर्निटी मॉलशेजारी असलेल्या महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचे काम २०१५ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, चार वर्षे उलटूनही ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. अद्यापही या स्मारकाची रंगरंगोटी आणि इतर काही कामे शिल्लक आहेत.
ठाणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना आणि हे स्मारक शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागात असतानाही त्यांना ते वेळेत पूर्ण करून घेता आले नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.
या स्मारकाचे भूमिपूजन २९ आॅगस्ट २०१४ रोजी झाले. या कामासाठी ११ कोटी १२ लाख ४६ हजार ५२९ रुपयांचा खर्च केला जाणार आहे. ते २०१५ अखेर उभे करण्याचा महापालिकेचा प्रयत्न होता. स्मारक उभारण्यास व त्यासाठीच्या अंदाजे खर्चास महासभेने मंजुरी दिल्यानंतर स्मारकाचा ठराव नोव्हेंबर २०१२ मध्ये महासभेकडून मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर, तब्बल दोन वर्षे उशिराने या कामाचा नारळ वाढविण्यात आला होता. निविदा प्रक्रिया आणि सोपस्कार करण्यासाठी सत्ताधाऱ्यांना दोन वर्षांचा कालावधी दिला गेला. त्यानंतरही २०१५ मध्ये पूर्ण होणारे हे स्मारक २०१९ वर्ष संपत आले, तरी त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. अद्यापही विद्युत, रंगरंगोटी आणि इतर महत्त्वाची कामे शिल्लक आहेत. ती एक महिन्यात उरकण्याची लगीनघाई आता सत्ताधाºयांकडून सुरूआहे. >असे असेल
ठाण्यातील स्मारक
इटर्निटी मॉलच्या शेजारी एक हजार ८७१ चौरस मीटर, १२९.६ चौरस मीटर व ८५.४ चौरस मीटरचे तीन सुविधा भूखंड असून त्यावर हे स्मारकाचे काम होणार आहे. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर ठाण्यामध्ये त्यांचे स्मारक व्हावे म्हणून शिवसेनेने प्रयत्न केले होते. या स्मारकाची अंमलबजावणी होण्यास उशीर होत असल्याचे कारण पुढे करून शिवसेनेचे नगरसेवक आणि तत्कालीन महापौर हरिश्चंद्र पाटील यांच्यात भरसभेत वादावादी झाली होती. दरम्यान, या स्मारकाच्या ठिकाणी बाळासाहेबांचा संपूर्ण इतिहास आणि जीवनप्रवासाची सर्वसमावेशक माहिती भावी पिढीला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे, त्यांचा जीवनप्रवास, प्रासंगिक फोटो, त्यांची भाषणे, पुस्तके आणि सीडी स्वरूपात या स्मारकात ठेवण्यात येणार आहेत. ७२ बाय ७२ आकाराचे पिरॅमिड पद्धतीचे छप्पर असलेल्या पारदर्शक काचेचा वापर करण्यात आलेली एक इमारत बांधण्यात येणार आहे. तळ मजल्यावर प्रशासनिक कार्यालय, पहिल्या मजल्यावर व्यंगचित्र दालन, दुसºया मजल्यावर वाचनालय आणि गं्रथालय अशा सुविधा आहेत. तिसºया मजल्यावर सुविधा भूखंडावर लग्नासाठी लॉन्स निर्माण करण्यात येणार आहे. इमारत बांधकाम, इमारतीतील इतर सुविधा व पायाभूत सुविधांसाठी ११ कोटी १२ लाख ५२९ हजार रुपयांचा खर्च केला गेला आहे. ही दुमजली पिरॅमिड वास्तू उभारली जाणार आहे. याशिवाय, साउंड लाइट स्टुडिओमध्ये बाळासाहेबांच्या दुर्मीळ भाषणांच्या ध्वनिफिती ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय, प्रदर्शनाच्या माध्यमातूनसुद्धा बाळासाहेबांचा जीवनपट येथे साकारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कलाकाराच्या निवासाचीसुद्धा व्यवस्था केली जाणार आहे. अभ्यासिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शांतता मिळणार आहे. मेडिटेशन आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यासाठी दालन उपलब्ध करून दिले जाणार आहे.