आयुक्तपदावर ‘भानामती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 03:24 AM2018-04-27T03:24:52+5:302018-04-27T03:24:52+5:30
मीरा-भार्इंदर महापालिका : राजकीय स्वार्थापोटी सहा वर्षांत सहा अधिकाऱ्यांचे बळी
राजू काळे ।
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त बळीराम पवार यांनी ९ फेब्रुवारीला पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच त्यांची बदली झाली. भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी मतभेद झाल्याने पवार यांची बदली झाल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्तपदावर सहा वर्षांत सहा आयुक्त आले व गेल्याने शहराच्या विकासाला खीळ बसली आहे.
पवार यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर लागलीच ‘लोकमत’कडे मीरा-भार्इंदर महापालिकेतील राजकारण व लोकप्रतिनिधींची दंडेलशाही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांची राजकीय दबावापोटी बदली होण्याची शक्यता दि. १० फेब्रुवारीच्या बातमीत व्यक्त करण्यात आली होती. दुर्दैवाने ती खरी ठरली.
राजकीय बळी घेण्यात येऊन त्यांच्या बदलीचे षड्यंत्र रचण्यात स्थानिक भाजपा आ. नरेंद्र मेहता यशस्वी झाल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. राजकीय स्वार्थापोटी गेल्या सहा वर्षांत सहा आयुक्तांचा बळी घेतल्याने त्याचा शहराच्या विकासावर विपरित परिणाम होऊ लागला आहे.
पवार यांचीही नियुक्तीपूर्वी मीरा-भार्इंदर पालिकेत काम करण्याची मानसिकता नव्हती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहाखातर ते आयुक्तपदी विराजमान झाले. यापूर्वीच्या आयुक्तांचा राजकीय दबावापोटी बळी गेल्याचा इतिहास त्यांना अवगत असल्याने पवार पालिकेतील आपला कार्यकाळ पूर्ण करतील किंवा कसे, याची साशंकता निर्माण झाली होती.
मुख्याधिकारी श्रेणीतील आयुक्त शिवमूर्ती नाईक यांच्या निवृत्तीनंतर विक्रम कुमार या सनदी अधिकाºयाची १२ जुलै २०११ रोजी आयुक्तपदी वर्णी लावण्यात आली. त्यांच्या कारभारावर नाराज झालेल्या सत्ताधारी काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीने केवळ दीड वर्षातच त्यांची उचलबांगडी केली. यानंतर, काँग्रेसचे तत्कालीन गृहराज्यमंत्री माणिकराव ठाकरे यांचे खाजगी सचिव सुरेश काकाणी हे २८ जानेवारी २०१३ रोजी आयुक्तपदी विराजमान झाले. त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी काँग्रेस-राष्टÑवादीने त्यांची बदली केली. २३ जुलै २०१४ रोजी तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांचे स्वीय सहायक सुभाष लाखे आयुक्तपदावर आले व अवघ्या सहा महिन्यांत राजकीय षड्यंत्रामुळे दूर केले गेले. २१ फेब्रुवारी २०१५ रोजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या शिफारशीवरून अच्युत हांगे यांची आयुक्तपदी वर्णी लावण्यात आली. हांगे यांचे भाजपा आ. नरेंद्र मेहता यांच्याशी खटके उडू लागल्याने मेहता यांनी त्यांच्या बदलीसाठी प्रयत्न सुरू केले, असे बोलले जाते. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी एमएमआर रिजनमधील ‘ड’ वर्गातील महापालिकांमध्ये सनदी अधिकाºयांची नियुक्ती करण्याचा निर्णय २०१५ मध्ये घेतला. त्यामुळे हांगे यांना अवघ्या सहा महिन्यांत पदावरून दूर केले. त्यांच्या जागी उल्हासनगर मनपाचे तत्कालीन आयुक्त बालाजी खतगावकर यांची पालिकेत वर्णी लावण्यासाठी मेहता यांनी फिल्डिंग लावली. मात्र, पुन्हा पंकजा मुंडे यांनी मेहता यांच्या मनसुब्यांना छेद देत आपले स्वीय सहायक डॉ. नरेश गीते यांची १६ आॅगस्ट २०१६ रोजी आयुक्तपदावर वर्णी लावली. गीते यांच्याशीसुद्धा मेहता यांचे खटके उडू लागल्याने मेहता यांनी त्यांच्या बदलीसाठी प्रयत्न सुरू केले. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मध्यस्थीने गीते यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपल्या बदलीकरिता प्रयत्न केले व त्यात त्यांना यश आले. पुन्हा खतगावकर यांच्याकरिता पायघड्या घालण्याकरिता मेहतांचे प्रयत्न सुरू झाले. त्यावेळी मेहतांच्या प्रयत्नांना छेद देत मुख्यमंत्र्यांनी गृहनिर्माण विभागाचे सहसचिव बळीराम पवार यांची ९ फेब्रुवारी २०१८ रोजी आयुक्तपदावर नियुक्ती केली. पवार यांनी नाखुशीनेच कार्यभार स्वीकारला. नेत्यांच्या मनमानीमुळे शहराचा विचका होत असल्याने मतदार नाराजी प्रकट करीत आहेत.
मेहता यांचे पुन्हा खतगावकरांसाठी प्रयत्न
आयुक्तपदी येताच पालिकेच्या विस्कटलेल्या कारभाराची घडी नीट बसवण्यास सुरुवात केली. दरवर्षी दुपटीने वाढवले जाणारे अंदाजपत्रक यंदाच्या वर्षी ३०० कोटी रुपयांहून कमी करून अनावश्यक खर्चांना कात्री लावली होती.सत्ताधारी भाजपाच्या एक कोटी रुपयांच्या निधीच्या मागणीला पवार यांनी विरोध केला. पवार यांच्या बदलीचे प्रयत्न गेल्या १० दिवसांपासून सुरू होते. त्यात यश आल्याने पुन्हा खतगावकर यांच्याकरिता प्रयत्न सुरू आहेत. विधानसभा निवडणुका असल्याने मेहता यांना हवा असलेला अधिकारी आयुक्तपदी येईल, अशी चर्चा आहे. याबाबत आ. मेहता यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद दिला नाही.