‘बॅण्डबाजा’ ठरतोय डोकेदुखी

By admin | Published: March 3, 2016 02:10 AM2016-03-03T02:10:58+5:302016-03-03T02:10:58+5:30

आर्थिक वर्षअखेरीस थकबाकीदारांच्या घरासमोर जाऊन बॅण्डबाजा वाजवण्याचा मनपाचा फंडा दहावी-बारावीचे विद्यार्थी, वृद्ध, रुग्ण यांच्याकरिता डोकेदुखी ठरला आहे.

'Bandjava' leads to headache | ‘बॅण्डबाजा’ ठरतोय डोकेदुखी

‘बॅण्डबाजा’ ठरतोय डोकेदुखी

Next

धीरज परब, मीरा रोड
आर्थिक वर्षअखेरीस थकबाकीदारांच्या घरासमोर जाऊन बॅण्डबाजा वाजवण्याचा मनपाचा फंडा दहावी-बारावीचे विद्यार्थी, वृद्ध, रुग्ण यांच्याकरिता डोकेदुखी ठरला आहे. ज्यांनी नियमित कर भरला त्यांनाही या बॅण्डबाजाची डोकेदुखी सहन करावी लागत असल्याने महापालिका प्रशासनाकडून शांतता क्षेत्रात ध्वनिप्रदूषण केले जात असल्याचा गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली काही संघटनांनी सुरू केल्या आहेत.
कर वसूलीकरता थकबाकीदारांच्या घरासमोर जाऊन बॅण्डबाजा वाजवण्याची कायद्यात तरतूद नाही. शाळा, हॉस्पिटल, धार्मिक स्थळे या शांतता क्षेत्रांत यामुळे ध्वनिप्रदूषण होत आहे. त्यातच सध्या १०वी, १२वीच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांकडूनही तक्रारी येत आहेत. सर्वसामान्य जनतेला त्रासदायक ठरत असलेली ही बेकायदा ‘बॅण्डबाजा वसुली’ बंद करण्याची मागणी ‘जिद्दी मराठा संस्थेने’ केली आहे.
मीरा-भार्इंदर महानगरपालिकेला दरवर्षी आर्थिक वर्ष संपायला आले की, मालमत्ता करवसुली बाकी असल्याचा साक्षात्कार होतो. यंदाही थकबाकी वसूल करण्यासाठी पालिकेची लगीनघाई सुरू झाली आहे. वसुलीकरिता नळजोडण्या तोडण्यापासून बॅण्डबाजा वाजवण्यापर्यंत अनेक हातखंडे अमलात आणले जातात.
पालिकेचे करवसुली करणारे लिपीक बॅण्डबाजा वाजवत सर्वत्र फिरतात. बॅण्डबाजाच्या कर्णकर्कश कानठळ्या बसणाऱ्या आवाजाने नागरिक त्रासले आहेत. थकबाकीदारांकरिता वाजविण्यात येणारा हा बॅण्डबाजा ज्यांनी कर भरला त्यांच्याकरिता जाचक ठरत आहे. १०वी व १२वीच्या परीक्षार्थ्यांनी या बॅण्डबाजाविरुद्ध तक्रारी केल्या आहेत. शाळा, रुग्णालय आदी शांतता क्षेत्रात तो वाजवल्याने पालिकेकडून ध्वनिप्रदूषणासंबंधीच्या कायद्याचे उल्लंघन होत असल्याची तक्रार जिद्दी मराठा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप जंगम यांनी पोलीस अधीक्षक, पालिका आयुक्त व प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे केली आहे.

Web Title: 'Bandjava' leads to headache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.