ठाणे : कुख्यात डॉन छोटा राजन उर्फ राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ नाना याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर्स ठाणे शहरातील प्रमुख ठिकाणी लागल्याने शनिवारी खळबळ उडाली. ही बॅनर्स हटवण्यासाठी ठाणे शहर पोलिसांची धावपळ झाल्याचे पाहायला मिळाले. ती बॅनर्स उतरवल्यानंतर ठाणे शहर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केल्याचे ठाणे शहर परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी सांगितले.
ठाण्याच्या गडकरी रंगायतन, कळवा नाका आणि धर्मवीरनगर (तुळशीधाम) येथील असलेल्या ठाणे महापालिकेच्या टीएमटी बसथांब्यावर छोटा राजन याच्या वाढदिवसानिमित्त बॅनर्स लावली होती. त्याचा वाढदिवस १३ जानेवारीला असून त्याचे औचित्य साधून शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास शुभेच्छा देणारी बॅनर्स लावण्यात आली. त्यावर सी.आर. सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य असा उल्लेख असून आधारस्तंभ राजेंद्र सदाशिव निकाळजे याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असा मजकूर लिहिला आहे. या बॅनर्सवर शुभेच्छुक म्हणून संघटनेचे ठाणे शहराध्यक्ष प्रकाश भालचंद्र शेलटकर यांच्या नावासह संघटनेच्या ठाणे शहर महिला अध्यक्ष संगीताताई शिंदे, मुंबई शहराध्यक्ष राजाभाऊ गोळे आणि संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट हेमचंद्र उर्फ दादा मोरे आदींची छायाचित्रे आहेत. छोटा राजन याच्या जुन्या आणि नवीन फोटोंसह शुभेच्छा देणारी ही अनधिकृत बॅनरबाजी झाल्यावर तिची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेऊन ही बॅनर्स हटवून अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.
राजन याच्याविरोधात हत्या, खंडणीसह धमकावणे आदी विविध गुन्ह्यांची नोंद असून, मुंबईतील एका वरिष्ठ पत्रकाराच्या हत्येप्रकरणी परदेशातून त्याला अटक करण्यात आली. तेव्हापासून तो तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्याच्याविरुद्ध सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीस तो व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहतो.