कलाम सरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सामर्थ्यशाली बना - मिलिंद चौधरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 03:28 PM2021-10-14T15:28:22+5:302021-10-14T15:28:34+5:30
आज जगातील १८ देशांत या संस्थेचे कार्य सुरू आहे. यशस्वी बनण्यासाठी तुम्ही तुमचे तत्त्वे बनवा हे सांगताना शेवटी त्यांनी कलाम फौंडेशन कसे कार्य करते याची माहिती दिली.
ठाणे : कलाम सरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वतः सामर्थ्यवान बना. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी फार मोठ्या गोष्टी करण्याची गरज नाही. आहे त्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने केल्यास आपण त्यांचे स्वप्न साकारू शकतो असे मत डॉ. ए पी जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फौंडेशनचे सरचिटणीस मिलिंद चौधरी यांनी व्यक्त केले.
माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या ९० व्या जयंती निमित्त गुरुवारी आदर्श विकास मंडळ संचालित कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्यावतीने एक दिवस आधीच वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी "कलाम सर आणि त्यांचे व्हिजन" याविषयावर चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, प्रत्येक यशाची सुरुवात छोट्या प्रयत्नांतून होत असते. रोज वर्तमानपत्र वाचण्याची सवय ठेवा. यशस्वी बनायचे असेल तर जुन्या सवयी मोडा. तुम्ही ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात इतके नाव उंच करा की, त्या क्षेत्राचे तुम्ही कलाम बना. कलाम सरांना फॉलो करणे म्हणजे केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात यश मिळविणे असे नाही तर कोणत्याही क्षेत्रात नाव उंचविले तरी तुम्ही कलाम फॉलोअर्स होऊ शकता असा संदेश चौधरी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कलाम सर नेहमी म्हणत स्वप्न ती असतात जी रात्री झोपू देत नाही त्यामुळे मोठी स्वप्ने पहा. बदल हा स्थिर आहे त्याव्यतिरिक्त काहीही स्थिर नाही हे लक्षात ठेवा. जे बदल स्वीकारतात तेच आयुष्यात यशस्वी होतात. तुम्ही जग बदलू शकत नाही पण आयुष्यात काहीही करायचे असेल तर स्वतःला मात्र बदलावे लागेल तरच तुम्हाला यश मिळेल. १८ ऑक्टोबर २०१५ रोजी कलाम कुटुंबीयांनी या फौंडेशनची स्थापना केली. आज जगातील १८ देशांत या संस्थेचे कार्य सुरू आहे. यशस्वी बनण्यासाठी तुम्ही तुमचे तत्त्वे बनवा हे सांगताना शेवटी त्यांनी कलाम फौंडेशन कसे कार्य करते याची माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष गावडे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. वाचन प्रेरणा दिनानिमित्त महाविद्यालयाच्यावतीने प्रश्नमंजुषा स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाने विविध सार्वजनिक स्थळी जाऊन चालत बोलता डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर उपस्थित लोकांना प्रश्न विचारले. योग्य उत्तरे देणाऱ्या सहभागीना महाविद्यालयातर्फे प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक केले. मंडळाचे अध्यक्ष सचिन मोरे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पार पडला.