ठाणे : शिक्षणापासून वंचित असलेल्या शाळाबाह्यमुलांना आता शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने पाऊल उचलले आहे. त्यानुसार, टीएमटीच्या भंगार बसचे शाळेत रूपांतर करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. तुर्फेपाडा परिसरात दोन भंगार बसमध्ये भाग शाळेची निर्मिती केली जाणार असून त्याठिकाणी पूर्व प्राथमिक ते दुसरीपर्यंतची शाळा भरविण्यात येणार आहे. या उपक्र मासाठी २४ लाख रु पये खर्च केले जाणार असून यासंदर्भातील प्रस्ताव सोमवारी होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवणार आहे.
ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने यापूर्वी सिग्नल शाळेची संकल्पना राबविली आहे. ही यशस्वी झाल्यानंतर प्लॅटफॉर्म शाळा हा उपक्रमही राबविला आहे. त्यानंतर, आता शाळाबाह्यमुलांसाठी हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सध्याच्या घडीला महापालिकेच्या शाळांमध्ये विविध माध्यमांतून ३५ हजारांच्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु, शाळांचा पट वाढविण्याबरोबरच शाळांची गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टिकोनातून पालिकेने शाळाबाह्य मुलांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शाळा आपल्या दारीच्या माध्यमातून भाग शाळा हा उपक्र म राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या भाग शाळेसाठी ठाणे परिवहनच्या भंगार बसचा वापर केला जाणार आहे. या अभिनव उपक्रमाचा पहिला प्रयोग आता घोडबंदर भागातील तुर्फेपाडा परिसरात केला जाणार आहे.
पहिल्या शाळेसाठी २४ लाख खर्चआझादनगर परिसरामध्ये महापालिकेमार्फत प्राथमिक शाळा क्र मांक ५५ चालविण्यात येते. या शाळेत धर्माचापाडा, ब्रह्मांड, तुर्फेपाडा तसेच आसपासच्या परिसरातील मुले शिक्षण घेतात. या भागातील शाळाबाह्य मुलांना तसेच अर्धवट शिक्षण सोडलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम महापालिकेने केले. मात्र, या मुलांच्या घरापासून आझादनगर शाळेचे अंतर जास्त असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीचे प्रमाण वाढले आहे. तसेच घराजवळील परिसरातच शाळा सुरू करण्याची मागणी पालकांनी पालकसभेमध्ये मुख्याध्यापकांकडे केली होती.
मात्र, परिसरात नवीन शाळेची उभारणी करणे ही मोठी खर्चिक बाब असल्यामुळे शिक्षण विभागाने टीएमटीच्या भंगार बसचे शाळेत रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव शिक्षण विभागाने तयार करून तो येत्या सोमवारी होणाºया महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवणार आहे. या उपक्रमासाठी २४ लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.