ठाणे : शहरातील खड्डे दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेऊन पाहणी करताना ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसएसआरडीसीसह सर्वच यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. यावेळी पालकमंत्र्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाल्याचे चित्र शुक्रवारी दिसले.
शिदें यांनी एसएसआरडीसी, ठामपा, एमएमआरडीए आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्वच प्रमुख अभियंत्यांना आनंदनगर तपासणी नाका येथे फैलावर घेतले. त्यावेळी ते ज्या विभागाचे नाव घेत होते, त्या अधिकाऱ्यांची चांगलीच केविलवाणी अवस्था झाली होती. ठाणे ते पडघा मार्गावर जाताना शिंदे यांनी तीनहात नाका येथे वाहनांच्या ताफ्यातून उतरून रस्ते दुरुस्तीची पाहणी केली तसेच कामाचा दर्जा सुधारण्याच्या स्पष्ट सूचना केल्या. मानपाड्यामध्ये सेवा रस्ता कुठे आहे? तिथे सर्व खड्डे झाले आहेत. या खड्डयांमुळे होणाऱ्या अपघातांना तसेच गैरसोयीला नागरिकांना सामोरे जावे लागते, हे थांबले पाहिजे, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक विभागाच्या तसेच महामार्ग विभागासह अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांच्या पाहणी दौऱ्यावेळी स्पॉटवरच अधिकाऱ्यांना त्यांनी फैलावर घेतले. सरकार रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पैसे देते, पण पहिल्याच पावसात ते कसे उखडतात. त्यामुळे सरकारचे नाव खराब होते. या कामाचा दर्जा तपासणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांचीही चौकशी करा, असे आदेशही त्यांनी दिले.
दौरा सुरू होण्यापूर्वीच गुरुवारी रात्री आनंदनगर नाका येथे काम केल्याचे तसेच तीनहात नाका येथे कामाला नुकतीच सुरुवात झाल्याचे स्पष्ट दिसत होते.
* पुढे कामाला सुरुवात झाली का?
पालकमंत्र्यांचा दौरा सुरू झाल्यामुळे आनंदनगरपासून ते भिवंडीपर्यंत ते येणार असल्यामुळे आनंदनगर येथूनच अधिकारी कनिष्ठ अधिकाऱ्यांना पुढच्या रस्त्याचे काम सुरू झाले का? पालकमंत्री येत आहेत, असे सांगून कामाची खातरजमा करत असल्याचेही यावेळी पाहायला मिळाले.
--------------