डोंबिवली: भीमा-कोरेगाव प्रकरणाचे पडसाद डोंबिवलीत सोमवारी रात्रीच उटमले. त्या घटनास्थळी शहरातून गेलेल्या गाडया रात्री उशिराने डोंबिवलीत दाखल झाल्या. त्यानंतर शेलार नाका परिसरात आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी येत रात्री ९.३० ते १० वाजण्याच्या कालावधीत सुमारास गाड्यांची तोडफोड, तसेच दगडफेक करत काही मिनिटे रास्ता रोको केला. त्यात काही नागरिक जखमी झाले तर पोलिसांवरही हल्लयाचा प्रयत्न झाला. पण घटनास्थळी तातडीने रामनगरसह टिळकनगर पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस उपायुक्त रवींद्र वाडेकर यांच्यासह रामनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक विजयसिंग पवार, टिळकनगर पोलिस ठाण्याचे शिवाजी धुमाळ यांच्यासह पोलिस निरिक्षक महेश जाधव यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. शेलार नाका परिसरात आलेल्या जमावाला शांत करण्याचे आवाहन वाडेकर यांनी केले, तर अन्य पोलिसांनी तातडीने नागरिकांना घरी जाण्यास सांगितले, तर जखमींना नजीकच्या रुग्णालयात जाऊन उपचार करण्याचे आवाहन केले. ज्या गाड्यांचे नुकसान झाले त्यांनाही सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार असल्याचे वाडेकर म्हणाले. घटनेची माहिती मिळताच राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत कांबळे, राजू शेख, रवीसिंग ठाकुर, आरपीआय नेते प्रल्हाद जाधव आदींनी घटनास्थळी धाव घेतली. वाडेकर यांच्यासह पथकाने रात्रीच परिसरातील सीसी कॅमे-याचे फुटेज मिळवत तपास यंत्रणेला सूचना दिल्या. मानपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक गजानन काब्दुल्ले हे देखिल घटनास्थळी आले होेते. त्यांनी एसीपी वाडेकर यांच्याशी चर्चा करत मानपाडा हद्दीतील आरपीआय गटाच्या वस्त्यांनजीक बंदोबस्त तैनात करण्याच्या हालचाली केल्या. धुमाळ यांनीही कचोरे तर पवार यांनी कोपर परिसरातील हद्दीत बंदोबस्त तैनात केला. विष्णूनगर पोलिसांनाही वाडेकर यांनी सतर्कतेच्या सूचना देत कडक बंदोबस्त ठेवावा असे आदेश दिले. घटनास्थळी रात्री उशिराने विभागीय सहपोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे हे देखिल आले, त्यांनीही परिस्थितीचा आढावा घेत वाडेकर यांना सर्व सूचना दिल्या, त्यानूसार तात्काळ कडेकोट बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले. सोमवारी मध्यरात्री उशिरापर्यंत तणाव कायम होता. परिस्थिती चिघळू नये यासाठी रात्रीच त्या ठिकाणी दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव शिघ्र कृती दलाचे पथकही वाहनासह पोहोचले होते, घटनास्थळाचा त्यांनीही अंदाज घेत ताबा घेतला होता.- डोंबिवलीच्या पोलिस यंत्रणेने रात्रीच बंदोबस्त लावल्याने मंगळवारी राज्यात जरी त्या घटनेचे पडसाद उटमले तरी त्या तुलनेत डोंबिवली शहरात वातावरण शांत होते. जनजीवन सुरळीत चालु होते. नेमके कोण दंगामस्ती करु शकतो याचाही पोलिसांनी अंदाज घेत तात्काळ नियोजन केले, त्यामुळेच शहरात दिवसभरात संध्याकाळपर्यंत कुठेही अनुचित घटना घडली नाही.- शेलार नाक्यावर सोमवारी रात्री झालेल्या दगडफेकीसह वाहनांच्या नुकसानीची पोलिस यंत्रणेने गंभीर दखल घेतली. मंगळवारी दिवसभरात पाच जणांच्या तक्रारी रामनगर पोलिस ठाण्यात दाखल करुन घेण्यात आल्या आहेत. संध्याकाळी उशिरापर्यंत ते काम सुरु होते, त्या तक्रारी पुणे ग्रामिणकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजयसिंग पवार यांनी दिली. आकाश कांबळे, दिनेश कांबळे, प्रविण गायकवाड, दिपक बोर्डे, प्रविण वाघमारे सर्व शेलार नाका चौक परिसरातील रहिवासी असून या सगळयांनी तक्रारी दिल्याचे सांगण्यात आले.
भीमा-कोरेगावप्रकरणी डोंबिवलीत तणावपूर्ण शांतता, शेलारनाका-पाथर्लीला छावणीचे स्वरुप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2018 8:04 PM