भिवंडीत आतापर्यंत 131 पोलिसांना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 06:44 PM2020-08-04T18:44:38+5:302020-08-04T18:45:00+5:30
भिवंडी शहरातील परिमंडळ दोन अंतर्गत असलेल्या सहा पोलीस ठाण्यांसह नियंत्रण कक्ष व एसआरपीएफचे जवान अशा तब्बल 131 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.
नितीन पंडित
भिवंडी- सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असून कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांना देखील कोरोनाची लागण व मृत्यू झाल्याच्या घटना देशासह राज्यात घडल्या आहेत. दरम्यान भिवंडी शहरातील परिमंडळ दोन अंतर्गत असलेल्या सहा पोलीस ठाण्यांसह नियंत्रण कक्ष व एसआरपीएफचे जवान अशा तब्बल 131 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यात 31 पोलीस अधिकारी तर 100 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात भिवंडीत कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला त्यानंतर रुग्णवाढीचा वेग वाढतच गेला. सध्या शहरात 3671 तर ग्रामीण भागात 3126 असे एकूण 6797 रुग्ण आढळले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेबरोबरच पोलीस यंत्रणेवर देखील ताण वाढला होता त्यातच शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या परिमंडळ दोन मधील सहाही पोलीस ठाण्यांसह नियंत्रण कक्ष व एसआरपीएफ जावं अशा एकूण 131 पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती . विशेष म्हणजे यातील 114 पोलीस कर्मचारी बरे झाले असून त्यातील 77 पोलीस पुन्हा कर्तव्यावर हजार झाले आहेत. तर 17 पोलीस कर्मचाऱ्यांवर सध्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपयुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे.