Bhiwandi Building Collapse: शेख कुटुंबावर काळाचा घाला; एकाच परिवारातील सहा जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 11:51 PM2020-09-22T23:51:24+5:302020-09-22T23:51:42+5:30
वृद्ध मातापित्यांचा आधारवड हरपला
- नितिन पंडीत
भिवंडी: शहरातील धामणकर नाका परिसरातील पटेल कंपाऊंड येथे तीन माजली जिलानी हि धोकादायक इमारत कोसळल्याची घटना सोमवारी पहाटे तीन वाजता घडली आहे . या दुर्घटनेत आता पर्यंत 23 जणांचा बळी गेला असून 25 जण जखमी झाले आहेत. दरम्यान दुर्घटना झालेला हा सोमवार या इमारतीत राहणाऱ्या शेख कुटुंबियांसाठी काळा दिवस ठरला आहे. शेख परिवारातील सहा जणांचा मृत्यू झाला असल्याने संपूर्ण परिवारावर काळाने घाला घातला आहे. दोन कर्ती मुले गमावल्याने आपला आधरवडच हरपला असल्याने आता कुणाच्या भरवशावर जगायचे असा प्रश्न वृद्ध मातापित्यांना पडला आहे.
57 वर्षांचे युसूफ शेख हे आपल्या मूळगावी लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील हाळी या गावी आपल्या पत्नी व लहान मुलगा सोहेल ( वय वर्ष 21 ) यांच्या सोबत राहतात. सोहेल याने बीए ची परीक्षा दिली असून सुट्यांमध्ये एक महिन्यांपूर्वीच सोहेल हा भिवंडीतील आपला मोठा भाऊ आरिफ याच्या घरी एका महिन्यासाठी राहायला आला होता. 3 ऑक्टोबरला एका परीक्षेसाठी तो पुन्हा गावाला जाणार होता मात्र या इमारत दुर्घटनेत त्याचाही मृत्यू झाला आहे . तर मोठा मुलगा आरिफ युसूफ शेख ( वय 35 ) हा 2001 साली मोठ्या बहिणीच्या लग्नांनंतर भिवंडीत आले होते. व्यवसायाने वाहन चालक असलेल्या आरिफ यांचा 12 वर्षांपूर्वी नसीमा यांच्यासोबत निकाह झाला होता . त्यांना दहा वर्षांची निदा व आठ वर्षांची लड्डू व एक तीन वर्षांचा मुलगा हसनैन अशी एकूण तीन मुले होती. आपल्या परिवारासह एक वर्षांपूर्वीच आरिफ दुर्घटनाग्रस्त जिलानी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहायला आले होते. इमारत धोकादायक असल्याने आरिफ दुसरीकडे राहण्यासाठी घर शोधात होते मात्र घर शोधण्याच्या आधीच सोमवारी झालेल्या दुर्घटनेत आरिफ शेख यांचा संपूर्ण परिवार उध्वस्त झाला. इमारत दुर्घटनेत आरिफ शेख यांच्यासह त्यांची पत्नी नसीमा मुलगी निदा व लड्डू तसेच लहान मुलगा हसनैन यांच्यासह लहान भाऊ सोहेल अशा सहा जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.
परिवारातील सहा जणांचा मृत्यू झाल्याने या शेख परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मंगळवारी आरिफ व सोहेल यांचे वडील युसूफ शेख हे भिवंडीत आले असून उध्वस्त झालेल्या परिवाराच्या आठवणीत त्यांचे अश्रू अनावर झाले आहेत. सोहेल हा मला रोज फोन करून माझी विचारपूस करत असे बाबा तुम्ही माझी काळजी करू नका आईकडे लक्ष द्या असा फोन सोहेल याने मला रविवारी रात्री नऊ वाजता केला होता त्यावेळी आरिफसह नातवंडांशीही माझे बोलणे झाले होते आणि पहाटे साडेतीनच्या सुमारास इमारत कोसळल्याचा फोन आला तेव्हापासून माझे हातपायच गळून गेले आहेत. त्यांची आई देखील गावी प्रचंड मानसिक तणावात सापडली आहे. आता पुढचे आयुष्य कुणाच्या भरवशावर काढणार अशी भावनिक प्रतिक्रिया युसूफ शेख यांनी दिली आहे .
मी मागच्या आठवड्यात माझ्या छोट्या बहिणीची तब्बेत बारी नसल्याने तिला पाहायला उदगीर येथे गेले होते रविवारीच आम्ही उदगीर येथून भिवंडीत येण्यासाठी निघालो होतो मात्र इथे आल्यावर हि दुर्दैवी घटना पाहायला मिळेल याचा विचार स्वप्नातही केला नव्हता अशी प्रतिक्रिया मृत आरिफ शेख यांची मोठी बहीण परवीन युनूस शेख यांनी दिली आहे.
रविवार असल्याने सोहेल मामा दुपारी तसेच रात्री दोन वेळ वेळा आमच्या घरी आले होते रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत मी त्यांना माझ्या घरी जेवणासाठी आग्रह धरला होता व त्यांना माझ्याच घरी राहण्याची विनंती केली होती. मात्र त्यांनी काहीएक न एकता ते मोठे मामा आरिफ यांच्या घरी गेले आणि रात्री हि दुर्घटना घडली ते जर माझ्या घरी राहिले असते तर आज वाचले असते अशी भावनिक प्रतिक्रिया मृत आरिफ व सोहेल यांचा भाचा सरीफ युनूस शेख याने दिली आहे .