भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर महानगर पालिकेची तिजोरी समजण्यात येणाऱ्या स्थायी समिती सभापतीची निवडणूक शुक्रवार, १३ डिसेंबर रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसचे हालीम अन्सारी, फुटीर काँग्रेस गटाचे इम्रान खान आणि भाजपचे सुमित पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र काँग्रेसला लागलेल्या ग्रहणामुळे भाजप - काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच सुरु झाली आहे. त्यातच काँग्रेसच्या फुटीर गटाचे इम्रान खान यांनी कोणार्क-भाजपशी हातमिळवणी केल्याने त्यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. त्यामुळे महापौरपद कोणार्क-भाजप युतीकडे आले असून, स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे सुमीत पाटील यांची निवड होण्याची शक्यता आहे.
स्थायी समितीमध्ये एकूण १६ सदस्य असून, त्यामध्ये काँग्रेसचे ८, भाजप ४, शिवसेना २, कोणार्क आणि समाजवादीचे प्रत्येके १ सदस्य आहेत. मात्र नुकत्याच पार पडलेल्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे १८ नगरसेवक फुटल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. यातील फुटीर नगरसेवकांमध्ये ४ नगरसेवक स्थायी समितीचे सदस्य आहेत. त्यामुळे हे सदस्य भाजप उमेदवार सुमित पाटील यांच्या गोटात गेल्याचे सांगण्यात येत असल्याने भाजपचे पारडे जड आहे.
गलीच्छ वस्ती सुधार समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या मनिषा दांडेकर, भाजपच्या नंदिनी गायकवाड, रिपाई ऐक्यवादीचे विकास निकम, उपसभापती पदासाठी काँग्रेसच्या फिरोजा शेख यांनी, तर क्रीडा समिती सभापतीपदासाठी काँग्रेसचे परवेज मोमीन, भाजपच्या मीना कल्याडप, कोणार्क विकास आघाडीच्या सविता कोलेकर, तर उपसभापतीपदासाठी काँग्रेसच्या नजमा अन्सारी, तसेच शिक्षण समिती सभापतीपदासाठी काँग्रेसच्या वैशाली मनोज म्हात्रे, भाजपचे प्रकाश टावरे, तर उपसभापती पदासाठी काँग्रेसच्या फरजाना रंगरेज व भाजपच्या कामिनी पाटील, तर आरोग्य व स्वच्छता समिती सभापतीपदासाठी काँग्रेसचे मुख्तार खान, फराज बहाउद्दीन, भाजपचे दिलीप कोठारी, तर उपसभापतीसाठी काँग्रेसचे साजिद अन्सारी, तसेच महिला व बाल कल्याण समिती सभापती पदासाठी काँग्रेसच्या नादिया खान, भाजपच्या कामिनी पाटील आणि उपसभापतीपदासाठी काँग्रेसच्या सुग्राबी खान, तर भाजपच्या दिपाली पाटील आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या पदांसाठी पालिकेच्या स्व. विलासराव देशमुख सभागृहात निवडणूक प्रक्रि या पार पडणार आहे.
शुक्रवारी सकाळी ११ वाजता ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजता विविध समितींच्या सभापती व उपसभापतींच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये बांधकाम समिती सभापती पदासाठी शिवसेनेचे अशोक भोसले, काँग्रेसच्या नाजेमा अन्सारी, रिपाई ऐक्यवादीचे शरद धुळे, भाजपच्या योगिता पाटील, तर उपसभापतीपदासाठी काँग्रेसचे जुबैर अन्सारी आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.