पोलीस अन् मनसेच्या कात्रीत भोंगेवाले; आधारकार्ड, मोबाईल क्रमांक नोंदवण्याचे पोलिसांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 02:34 PM2022-04-30T14:34:01+5:302022-04-30T14:35:01+5:30

ठाणे : येत्या ३ मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत तर भोंगे लावून दिवसात पाचवेळा हनुमान चालिसा लावू, असा इशारा ...

Bhongewale in police and MNS scissors; Police orders to register Aadhaar card, mobile number | पोलीस अन् मनसेच्या कात्रीत भोंगेवाले; आधारकार्ड, मोबाईल क्रमांक नोंदवण्याचे पोलिसांचे आदेश

पोलीस अन् मनसेच्या कात्रीत भोंगेवाले; आधारकार्ड, मोबाईल क्रमांक नोंदवण्याचे पोलिसांचे आदेश

Next

ठाणे : येत्या ३ मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत तर भोंगे लावून दिवसात पाचवेळा हनुमान चालिसा लावू, असा इशारा मनसेने दिल्यामुळे ठाण्यातील पोलिसांनी साऊंड सिस्टीम भाड्याने देणाऱ्या तसेच त्याची विक्री करणाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची ‘हजेरी’ घेतली. साऊंड सिस्टीम कुणाला भाड्याने देताय याची माहिती पोलिसांना देण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत, तर साऊंड सिस्टीम घेऊन जाणाऱ्या मनसैनिकांची माहिती दिल्यास दुकानात खळ्ळ खट्याक होण्याची भीती साऊंड सिस्टीम पुरवणाऱ्यांना वाटत आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात अचानक मशिदींवरील भोंग्यावरून हल्लाबोल केला. भोंगे उतरले नाहीत तर दिवसात पाचवेळा मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा वाजवू, असा इशारा राज यांनी ठाण्यातील उत्तर सभेत दिला होता. मनसेची आंदोलनाची मुदत संपत असून राज्य सरकारने लागलीच मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा निर्णय घेतलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन सरकार करील व आवाजाची मर्यादा घालून देईल. मात्र, सरसकट भोंगे उतरवणार नाही, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी जाहीर केले. तिकडे उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने मशिदींवरील भोंगे उतरवण्यास भाग पाडल्याने राज ठाकरे यांनी पुन्हा योगींचे कौतुक केले. येत्या तीन दिवसांत या विषयावरून वातावरण तापवण्याचा प्रयत्न दोन्हींकडून होणार आहे.

या पार्श्वभूमीवर ठाण्यातील बाजारपेठेतील साऊंड सिस्टीम विक्रेते व भाडेपट्ट्याने देणाऱ्या व्यापाऱ्यांना ठाणे नगर पोलिसांनी गुरुवारी बोलावून घेतले. येत्या काही दिवसांत जी व्यक्ती साऊंड सिस्टीम, भोंगे यांच्या खरेदीकरिता अथवा भाडेपट्ट्याने ते घेण्याकरिता येतील त्यांचे नाव, पत्ता नोंदवून ठेवणे पोलिसांनी अनिवार्य केले आहे. या व्यक्तींच्या आधारकार्ड, मोबाईल क्रमांकाखेरीज भोंगे त्यांना द्यायचे नाहीत, अशी तंबी पोलिसांनी दिली. त्यांच्या वास्तव्याचा पत्ता घेऊन तो पोलिसांनी मागितल्यास त्यांना उपलब्ध करून द्यायचा आहे. कुणी किती साऊंड सिस्टीम नेल्या याची नोंद ठेवणे बंधनकारक केले आहे. साऊंड सिस्टीम भाड्याने देणाऱ्या व्यापाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, मनसेच्या कार्यकर्त्यांनी वरील माहिती, आधारकार्ड देण्यास नकार दिला, तर आम्ही त्यांना सक्ती करू शकत नाही. कायदा हातात घेऊन ते आम्हाला व आमच्या दुकानाला लक्ष्य करू शकतात. त्यामुळे पोलीस व मनसे यांनी समोरासमोर बसून हा विषय सोडविला पाहिजे. आम्हा व्यावसायिकांना संकटात टाकणे योग्य नाही.

मनसेने आंदोलन जाहीर केल्यावर जर पोलीस असे आदेश देत असतील तर आमचे त्यांना सांगणे आहे की, मशिदीवर भोंगे लागत असताना जर पोलिसांनी अशा नोंदी घेतल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती. कोण भोंगे घेऊन जात आहे, याची नोंद ठेवण्याची सक्ती जर महाराष्ट्र शासन करायला भाग पाडत असेल तर यापेक्षा दुर्दैव काही नाही. आमचे भोंगे मोजताय तसे मशिदींवरील भोंगे मोजून घ्या. याचे परिणाम ३ मे नंतर सरकारला भोगावे लागतील.

-अविनाश जाधव, जिल्हाध्यक्ष, मनसे, ठाणे व पालघर.

Web Title: Bhongewale in police and MNS scissors; Police orders to register Aadhaar card, mobile number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.