बुलेट ट्रेनविरोधी संघर्षाला मोठे बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 12:35 AM2020-07-28T00:35:27+5:302020-07-28T00:36:13+5:30
मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य सकारात्मक : जमीन संपादन थांबवण्याची स्थानिकांची मागणी
हितेन नाईक।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : बुलेट ट्रेनची राज्याला आवश्यकता नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगून जमीन संपादनाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागे शिवसेना ठामपणे उभी आहे, असे जाहीर केल्याने बुलेट ट्रेनविरोधातील संघटनांच्या संघर्षाला मोठे बळ मिळाले असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अनेक ग्रामपंचायतींनी विरोध नोंदविला असताना जिल्हा प्रशासनातील काही अधिकाºयांकडून जमीन मोजणीदरम्यान पोलीस बळाचा वापर केला जात असल्याने शेतकºयांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक असलेल्या बुलेट ट्रेनची राज्यात आवश्यकता नसल्याचे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. बुलेट ट्रेन आणि वाढवण बंदर उभारणीबाबत मी जनतेच्या सोबत आहे, असे वचनही मुख्यमंत्र्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान जिल्हावासीयांना दिलेले आहे. या पार्श्वभूमीवर बुलेट ट्रेनची राज्यात आवश्यकता नाही, ती ट्रेन राज्यात चालवायचीच असेल तर ती विदर्भ अशी चालवावी, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी केंद्राला लगावला होता.
केंद्र सरकारने जपानच्या जपान इंटरनॅशनल को-आॅपरेशन एजन्सी या कंपनीला बुलेट ट्रेन उभारणीचा ठेका १.०८ लाख कोटी रुपयांना दिला आहे. यासाठी १४१५.७५ हेक्टर जमीन संपादन केली जाणार असून जिल्ह्यातील वसई, पालघर, डहाणू आणि तलासरी तालुक्यांमधील ७३ गावे बाधित होणार आहेत. या बाधित होणाºया गावांतील बहुतांशी ग्रामपंचायतींनी आपल्या क्षेत्रातील जमिनी देण्यास विरोध दर्शवला असून तसे ग्रामपंचायतींचे ठराव राज्य व केंद्र शासनासह संबंधित विभागांकडेही पाठवले आहेत. पर्यावरणीय संवेदनशील स्थळे म्हणून ओळखली जाणारी वसईमधील तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील काही भागही या ट्रेन प्रकल्पात येणार असून वैतरणा रेल्वे स्थानकाजवळील १.५६ हेक्टर खारफुटीचे क्षेत्र बाधित होणार आहे.
पालघर जिल्ह्यातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुुुजन विकास आघाडी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, मनसे, जनता दल आदी पक्षांसह आदिवासी एकता परिषद, कष्टकरी संघटना, भूमी सेना, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, भूमी अधिकार आंदोलन, किसान सभा आदी संघटनांनी विरोध दर्शवीत बुलेट ट्रेनचे सर्वेक्षण, मोजणी आदी कामे बंद पाडली आहेत. नुकतेच केळवे रोड येथे अद्ययावत यंत्रसामुग्रीद्वारे छुप्या पद्धतीने सुरू असलेले सर्वेक्षणाचे कामही स्थानिकांनी बंद पाडले होते.
ग्रामीण भागातील लोकांचा जमिनी संपादनाला अजूनही विरोध होत असून त्यांच्यामागे शिवसेना ठामपणे उभी आहे. नाणारप्रमाणेच आम्ही बुलेट ट्रेनबाबत जनतेसोबत उभे राहणार आहोत. मुंबई-सुरत ट्रेन मार्गाची आवश्यकता मला वाटत नाही, मात्र राज्य म्हणून बुलेट ट्रेनची आवश्यकता असेल तर राज्याची राजधानी व उपराजधानीला जोडणारी मुंबई-नागपूर अशी बुलेट ट्रेन सुरू करावी, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच केले आहे. या वक्तव्यामुळे बुलेट ट्रेनविरोधात आंदोलनांना बळ मिळाले आहे.
जिल्ह्यात शेतकºयांचा विरोध असतानाही पोलीस बळाचा वापर करून जमीन मोजणीचे काम छुप्या पद्धतीने सुरूच आहे. त्याचा आम्ही विरोध करीत असलो तरी जिल्ह्यात जमीन सर्वेक्षण, संपादनाचे कुठलेही काम करू नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी पालघर जिल्हाधिकाºयांना तत्काळ द्यावेत.
- काळूराम धोदडे, आदिवासी एकता परिषद