अंबरनाथ : येथील तहसील कार्यालयावर सोमवारी श्रमजीवी संघटनेने बिऱ्हाड मोर्चा काढला होता. त्यात शेकडो आदिवासीबांधव उपस्थित होते. आदिवासी भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी या वेळी त्यांनी केली.अंबरनाथ नगरपरिषदेने गेल्या आठवड्यात पालिकेच्या आरक्षित जागेवर झालेल्या अतिक्रमणांवर कारवाई करून भूखंड मोकळे केले होते. यामध्ये काही आदिवासींची घरेदेखील असल्याचा दावा श्रमजीवी संघटनेने केला होता. या कारवाईच्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी संघटनेने हा मोर्चा काढला होता. हुतात्मा चौकातून निघालेला मोर्चा तहसीलदार कार्यालयासमोर आला. आदिवासी गीत सादर करून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या व्यथा तहसीलदारांसमोर मांडल्या. तसेच आपल्या निवेदनात त्यांनी काही महत्त्वाच्या मागण्यांवर लक्ष देण्याची मागणी केली. त्यात आदिवासींना बेघर करणाऱ्या प्रशासनावर गुन्हा दाखल करणे, झोपडपट्टीधारकांना फोटोपास देणे, आदिवासीपाड्यांना गावठाणांचा दर्जा देणे, शहरी आणि ग्रामीण भागातील वनजमिनीवर असलेल्या आदिवासींच्या झोपड्या केंद्र शासनाच्या कायद्यान्वये व सुधारित नियम २०१२ प्रमाणे नियमानुकूल करणे, प्रकाशनगर येथील आदिवासींचे पुनर्वसन करणे, करवले, कातकरीपाडा, चिखलोली ठाकूरपाडा, वडवली, चंदनवाडी या ठिकाणच्या आदिवासीवाडीतील येणारे प्रकल्प रद्द करून आदिवासींच्या घरांचे विस्थापन थांबवणे, त्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ पाण्याची व्यवस्था करणे, रेशनवर धान्य सुरू करणे, बोगस लाभार्थ्यांना रद्द करणे आदी मागण्यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)
आदिवासींचा बिऱ्हाड मोर्चा
By admin | Published: February 09, 2016 2:15 AM