ठाण्यात शुक्रवारपासून बिर्याणी फेस्टीवल, २० व्हरायटीजच्या बिर्याणी एका छताखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 03:38 PM2018-02-19T15:38:05+5:302018-02-19T15:43:46+5:30
ठाण्यात शुक्रवारपासून बिर्याणी महोत्सवाचे आयोजन केले आहे. खुल्या मैदानात होणार ठाण्यातील हा एकमेव महोत्सव असल्याचे आयोजकांनी सांगितले.
ठाणे- ठाण्यात शुक्रवार ते रविवार २३, २४ ते २५ फेब्रुवारी या काळात बिर्याणी फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे. स्वराज्य इव्हेंन्टस संस्थेच्या वतीने बिर्याणी फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले असून ठाण्यातील विविध क्षेत्रातील नामवंत कलाकारांची संस्था ठाणे आर्ट ग्रीड (टॅग) ने याला पाठींबा दिला आहे.
या फेस्टीवलमध्ये खवय्यांना विविध प्रकारच्या बिर्याणीची चव आता चाखता येणार आहे. दिल्ली बिर्याणी, हैद्राबादी बिर्याणी, अवधी बिर्याणी अशा बिर्याणीच्या प्रसिध्द ब्रॅन्डच्या बिर्याणी या फेस्टीवलमध्ये उपलब्ध असणार आहेत. इटालियन बिर्याणी, मियॉनीज बिर्याणी, झमझम बिर्याणी असे बिर्याणीचे वेगळे प्रकार देखील या फेस्टीवलमध्ये चाखता येणार आहेत.जवळपास २० विविध प्रकारच्या बिर्याणीची चव येथे उपलब्ध असणार आहे, अशी माहिती आयोजक स्वराज्य इव्हेन्टसचे ह्रर्षद सर्मथ यानी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सिनेनाट्य अभिनेते उदय सबनीस देखील उपस्थित होते. ठाण्याला कलासांस्कृतिक वारसेबरोबर खवय्येगिरीचा देखील वारसा आहे. इंदौर जसे खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिध्द आहे तसे ठाणे देखील प्रसिध्द आहे. बिर्याणी फेस्टीवलच्या माध्यमातून ठाणेकरांना चांगल्या दर्जाच्या बिर्याणीची चव चाखता येणार आहे, असे सबनीस यानी सांगितले.ठाण्यातील जांभळी नाका येथील शिवाजी मैदानात २३ ते २५ फेब्रुवारी काळात बिर्याणी फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवारी संध्याकाळी बिर्याणी फेस्टीवलचे उदघाटन होणार आहे. तर शनिवार व रविवारी संध्याकाळी ५ ते सायंकाळी ११ वाजेपर्यंत फेस्टीवल सुरू राहणार आहे. खवय्याना बिर्याणीचा आस्वाद फेस्टीवलच्या ठिकाणीही घेता येणार असून पार्सलची देखील सोय उपलब्ध असणार आहे. बिर्याणीबरोबर विविध प्रकारचे स्टार्टस देखील फेस्टीवलमध्ये उपलब्ध असणार आहेत. फेस्टीवलच्या ठिकाणी रोज सायंकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम असणार असून लाईव्ह गजल सादर केली जाणार आहे.
-------------------------------------------------------
थोड बिर्याणीविषयी....
बिर्याणी हा पर्शियन शब्द असून बिरीयन या नावापासून याची उत्पत्ती झाली. बिरीयन म्हणजे कुकींगच्या आधी फ्राय करून वनवलेला पदार्थ. पर्शिया म्हणजे आत्ताचा इराण देश. मुघलांनी बिर्याणी हा पदार्थ भारतात आणला. मुघलांच्या शाही मुदपकखान्यातून बिर्याणी केली जायची आत्ता ती भारतीयांच्या घराघरात बिर्याणी आवडीने खाल्ली जाते.
१५९३-१६३१ याकालखंडात शाहजहान बादशाहीची बेगम मुमताज ( जिच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला गेला) ही देखील बिर्याणीची शौकीन होती. तिच्या कल्पनेतून बिर्याणी या डिशचा उगम झाला असाही काहीजणांचा दावा आहे. मुघल शासक बाबर याच्या आगमनापूर्वीही बिर्याणी भारतीयांना माहीत होती असाही काही इतिहासकारांचा दावा आहे. भात हा मुख्य घटक सर्व प्रकारच्या बिर्याणीत असतो. विविध मसाले, पदार्थात मुरवून बिर्याणी केली जाते.