खड्ड्यांविरोधात भाजप रस्त्यावर, शिवसेनेचाही विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 12:40 AM2019-09-17T00:40:55+5:302019-09-17T00:41:00+5:30

शहरातील खड्ड्यांच्या मुद्यावर सोमवारी भाजपने महापालिका मुख्यालयासमोर प्रशासनाविरोधात आंदोलन केले.

BJP against the potholes, Shiv Sena protests on the streets | खड्ड्यांविरोधात भाजप रस्त्यावर, शिवसेनेचाही विरोध

खड्ड्यांविरोधात भाजप रस्त्यावर, शिवसेनेचाही विरोध

Next

ठाणे : शहरातील खड्ड्यांच्या मुद्यावर सोमवारी भाजपने महापालिका मुख्यालयासमोर प्रशासनाविरोधात आंदोलन केले. अधिकाऱ्यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय... अशा आशयाचे फलक हातात धरून भाजपने प्रशासनाचा निषेध केला. दुसरीकडे स्थायी समितीच्या बैठकीतही सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला खड्ड्यांच्या मुद्यावरून चांगलेच धारेवर धरले. यावेळी सभापती राम रेपाळे यांनी खड्ड्यांची योग्य दुरुस्ती करावी, तसेच ज्या रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाली असतील, अशा ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
शहरातील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीत राहणारे ठाणेकर खड्ड्यांच्या सिटीत राहतात की काय, असा समज सामान्य ठाणेकरांचा होऊ लागला आहे. खड्ड्यांमुळे वाहतूककोंडीतही भर पडत आहे. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाºयांना झाले तरी काय, खाली डोके वर पाय, अशा आशयाचे फलक भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात झळकविण्यात आले. ठाण्यातील खड्डे कसे गोलगोल, अधिकारी करत आहे झोलझोल अशा आशयाचे गाणे गाऊनही त्यांनी यावेळी निषेध नोंदविला. भाजपचे गटनेते नारायण पवार, नगरसेवक अशोक राऊळ, मिलिंद पाटणकर, नम्रता कोळी, भरत चव्हाण आदींनी या आंदोलनात सहभाग नोंदविला.
दुसरीकडे हे आंदोलन सुरू असताना स्थायी समितीच्या बैठकीतही शहरातील खड्ड्यांचे पडसाद उमटले. सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेविका मालती पाटील यांनी खड्ड्यांचे छायाचित्र सादर करून ठाणेकर रस्त्यातून प्रवास करतात की बोटीतून, असा सवाल करीत असल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. ही स्मार्ट सिटी आहे की खड्ड्यांची सिटी आहे, असा सवाल भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी केला. खड्डे बुजविण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. परंतु, ते सर्वच प्रयोग सपशेल अपयशी ठरत आहेत. खड्डे बुजविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान मागविले जात आहे, त्यावर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. परंतु, असे असतानाही खड्डे बुजविल्यानंतर पुन्हा काही तासांतच खड्डे कसे पडतात, असा सवाल सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी केला. त्यामुळे ही पालिकेची फसवणूक नाही का, असा सवाल करून ज्यांच्याकडून अशा चुका झाल्या असतील, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. यापूर्वी खड्ड्यांची बिले ही भांडवली खर्चातून काढली जात होती. मात्र, यासाठी आयुक्तांना आदेश द्यावे लागले असून ती बिले भांडवली खर्चातून देऊ नये, असे त्यांनी सांगितले. वास्तविक पाहता, स्थायी समिती, महासभेची मंजुरी नसतानी ही बिले काढलीच कशी गेली, असा सवाल करीत त्यांनी प्रशासनाला चांगलेच अडचणीत आणले.
>‘ती’ बिले थांबवा
महासभेत बोलताना नगरअभियंता रवींद्र खडताळे यांनी शहरात रस्त्यांवर खड्डे पडले असल्याचे मान्य केले. मात्र, मागील १५ दिवसांत ९०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला असल्याने जगातील कोणतेही तंत्रज्ञान अशा परिस्थितीत खड्डे बुजवू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, शहरातील खड्डे तत्काळ बुजविण्यात यावेत, तसेच ज्या रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाली असतील, अशा ठेकेदारांवर कारवाई करतानाच, त्यांची बिले काढली जाऊ नयेत, असे आदेश सभापती राम रेपाळे यांनी प्रशासनाला दिले.

Web Title: BJP against the potholes, Shiv Sena protests on the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.