मीरारोड:- भाड्याने दिलेली शाळा साठी इमारत भाडेकरूने भाडे दिले नाही म्हणून रिकामी करण्यासाठी दोन महिलांना प्रवेशद्वाराचे टाळे तोडून आत बसवल्या प्रकरणी भाडेकरूच्या तक्रारीवरून भाजप नगरसेविका नीला सोन्स यांच्यावर मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
मीरारोडच्या लक्ष्मी पार्क भागात ७११ रेसिडेन्सी जवळील एक दोन मजली इमारत असून ती भाजपा नगरसेविका नीला सोन्स यांनी कुणाल रामचंद्र वैष्णव यांना तीन वर्षांच्या भाड्याने दिलेली आहे . त्याची मुद्र मार्च २०२१ मध्ये पूर्ण होणार आहे . त्या ठिकाणी निर्माण इंटरनेशनल परी स्कुल व डे केअर सेंटर चालवले जाते .
लॉकडाऊन काळा पासूनचे भाडे वैष्णव यांनी दिले नाही म्हणून जागा रिकामी करण्या बाबत निला यांनी सांगितले होते . तर नगरसेविका जागा रिकामी करण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचा तक्रार अर्ज मीरारोड पोलिसांना दिला होता . तसेच त्यांनी या बाबत ठाणे न्यायालयात धाव घेतली आहे .
वैष्णव यांनी डे केअर सेंटरचे टाळे तोडून दोन महिलांना तेथे बसवले असल्याची तक्रार पोलिसांना केल्यावर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली . तेथे आत मध्ये कुलूप लावून दोन महिला पॅसेजमध्ये बसलेल्या दिसल्या . पोलिसांनी सोन्स यांच्यावर जबरदस्ती प्रवेश केला म्हणून गुन्हा दाखल केला आहे.
नीला सोन्स यांनी सांगितले कि , मला मानसिक त्रास देण्यासाठी हे कट कारस्थान कोण करत आहे हे सर्वाना माहिती आहे . या ठिकाणी कोरोना मुळे प्लेग्रुप आदी चालत नसल्याने भाडेकरूने स्वतःच रिकामी करत असल्याचे आधी म्हटले होते . हा मुद्दाम निर्माण केलेला प्रकार आहे .