मुख्यमंत्र्यांविरोधात भाजपा नगरसेवक?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 02:36 AM2018-07-24T02:36:37+5:302018-07-24T02:37:20+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेसाठी सकारात्मक असताना त्यांच्याच पक्षाचे काही नगरसेवक स्वतंत्र नगरपालिका नको, अशी भूमिका घेत आहेत.
- अनिकेत घमंडी
डोंबिवली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेसाठी सकारात्मक असताना त्यांच्याच पक्षाचे काही नगरसेवक स्वतंत्र नगरपालिका नको, अशी भूमिका घेत आहेत. हे कितपत योग्य आहे, असा सवाल संघर्ष समितीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी केला. भर पावसाळ्यात बारवी धरण ओव्हरफ्लो झाले असताना २७ गावांमध्ये मात्र पाणीटंचाई आहे. त्यामुळे या महापालिकेत राहायचे तरी कशाला?, असा सवालही त्यांनी केला.
मागील आठवड्यात २७ गावांतील काही नगरसेवकांनी एकत्र येत केडीएमसीत राहण्यासाठी बैठक घेतली होती. पण त्यावेळी २७ गावांमधील सगळेच नगरसेवक हजर नव्हते. एका नगरसेविकेने तेथेही संघर्ष समितीचा मुद्दा लावून धरत स्वतंत्र नगरपालिका झालीच पाहिजे, अशी आग्रही भूमिका मांडली. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात फडणवीस यांनी २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यांच्या भूमिकेलाच काही नगरसेवक विरोध करत असतील तर फडणवीस यांनी त्याची गंभीर दखल घ्यावी, असेही पाटील म्हणाले.
२७ गावांमधून जेवढा महसूल मिळतो, तेवढ्याच रक्कमेची अमृत योजना आहे. स्वतंत्र नगरपालिका झाल्यावर आम्हीही ती राबवू शकतो. केडीएमसीने तीन वर्षांत आम्हाला दिले तरी काय?, ग्रामस्थांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने ते पावसाचे पाणी साठवून दिवस ढकलत आहेत. पण महापालिका मात्र पाणी देऊ शकत नाही, ही शोकांतिका आहे. ग्रामपंचायत काळात येथे २४ तास पाणी होते. आरोग्य सेवा नाही, चांगले रस्ते नाहीत, यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत.
मुख्यमंत्री त्यांचा शब्द नक्की पाळतील, असा विश्वास आहे. संघर्ष समितीचा पाठपुरावा योग्य दिशेने सुरू आहे. लवकरच नगरपालिका झाली की नवी दिशा, नवा मार्ग मिळेल. ग्रामस्थांना सर्वतोपरी सुविधा दिल्या जातील असेही पाटील म्हणाले.
‘त्या’ सुविधा स्वप्नवतच
२७ गावांमधील शाळा अजूनही जिल्हा परिषदेकडून केडीएमसीकडे वर्ग झालेल्या नाहीत. त्यामुळे त्या शाळांचा खर्चही जि. प. करत
आहे. आरोग्य केंद्रेही जि. प. च्या ताब्यात आहेत.
महापालिका पायाभूत सुविधा पुरवू शकत नसताना तेथे विरंगुळा, मनोरंजनाच्या सुविधा या तर स्वप्नवतच आहेत. त्यामुळे स्वतंत्र नगरपालिका होणेच आवश्यक आहे, यावर पाटील ठाम आहेत.