वृक्षप्राधिकरण समितीतील भाजपा सदस्यांच्या राजीनामा नाटयावर अखेर पडदा; बैठक पार पडल्याने राजीनामा मागे घेतल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2018 06:22 PM2018-01-09T18:22:11+5:302018-01-09T18:22:36+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण व उद्यान समितीची गेल्या अडीच महिन्यांत एकही बैठक पार न पडल्याने नाराज झालेल्या भाजपाच्या १० सदस्यांनी महापौर डिंपल मेहता यांच्याकडे नुकतेच राजीनामे दिले होते.
राजू काळे
भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण व उद्यान समितीची गेल्या अडीच महिन्यांत एकही बैठक पार न पडल्याने नाराज झालेल्या भाजपाच्या १० सदस्यांनी महापौर डिंपल मेहता यांच्याकडे नुकतेच राजीनामे दिले होते. अखेर सोमवारी या समितीची बैठक पार पडल्याने भाजपा सदस्यांनी दिलेल्या राजीनामा नाट्यावर अखेर पडदा पडुन त्यांनी आपले राजीनामे मागे घेतल्याचा दावा भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी केला आहे.
पालिकेत सत्ताधारी भाजपा व आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्यात सुरु असलेल्या शीतयुद्धामुळे सत्ताधारी, प्रशासनाच्या असहाकारामुळे पुरते हैरान झाले आहेत. त्यातच वृक्षप्राधिकरण व उद्यान समिती १६ ऑक्टोबर २०१७ मध्ये गठीत करण्यात आली. या समितीत एकुण १५ सदस्य असुन त्यात सत्ताधारी भाजपाच्या एकुण १० सदस्यांचा समावेश आहे. समिती गठीत झाल्यानंतर त्याची बैठक कमाल ४५ दिवसांच्या अंतराने आयोजित करणे प्रशासनाला नियमानुसार बंधनकार असते. परंतु, गेल्या अडीच महिन्यांपासुन एकही बैठक प्रशासनाकडुन आयोजित करण्यात आली नाही. या समितीचे अध्यक्ष आयुक्त असल्याने प्रामुख्याने भाजपाच्या सदस्यांनी आयुक्तांवर रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली. अशातच ११ जानेवारीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पालिका हद्दीतील पश्चिम महामार्ग क्रमांक ८ च्या रुंदीकरणासाठी सुमारे ६०० झाडांचा बळी दिला जाणार आहे. त्याचा प्रस्ताव रितसर मान्यतेसाठी समितीच्या बैठकीत आणणे आवश्यक असताना एकही बैठक आयुक्तांनी अद्याप आयोजित केली नसल्याने भाजपाच्या सदस्यांनी समितीच्या सदस्यत्वाचे राजीनामे नुकतेच महापौरांकडे सुपुर्द केले होते. वास्तविक राजीनामा द्यायचाच होता तर तो थेट आयुक्तांकडे सुपुर्द करणे अपेक्षित असतानाही भाजपा सदस्यांनी आयुक्तांना लक्ष्य करण्यासाठी दिलेल्या राजीनामा नाट्यावर राजकीय स्टंटबाजीचा आरोप होऊ लागला. त्या सदस्यांनी दिलेल्या राजीनाम्यांची कल्पना आयुक्तांना देखील नसल्याचे सांगुन बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. महामार्ग रुंदीकरणासाठी त्यात बाधित होणारी झाडे हटविण्यापुर्वी बैठकीच्या आयोजनाची वाट न पाहताच भाजपा सदस्यांनी दिलेल्या राजीनाम्यातील हवा आयुक्तांनी अखेर सोमवारी बैठकीचे आयोजन करुन काढलीच. पक्षाचे वरीष्ठ नेते व मंत्री महामार्गाच्या रुंदीकरणासाठी येणार असल्याचा साक्षात्कार त्या सदस्यांना झाल्याने त्यांनी ती झाडे हटविण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. तत्पुर्वी त्यांनी दिलेले राजीनामे मागे घेत बैठकीत सहभाग घेतल्याचे जिल्हाध्यक्षांकडुन स्पष्ट करण्यात आले.