Vidhansabha2019: युती तुटावी ही भाजप पदाधिकाऱ्यांची इच्छा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 08:59 AM2019-09-16T08:59:40+5:302019-09-16T09:00:47+5:30
निवडणूक म्हणजे राजकीय मंडळींसाठी एक प्रकारचा उत्सवच असतो. उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपतील इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून ठेवले आहे. उमेदवारीसाठी वर्षभर कार्यक्रम राबवून आपण सक्रिय असल्याचे वरिष्ठांच्या नजरेस आणून देत आहेत. म्हणूनच, युती तुटावी, अशी या इच्छुकांची प्रामाणिक इच्छा आहे.
पंकज पाटील, अंबरनाथ
युतीधर्म स्वीकारला गेला तर अंबरनाथची जागा ही साहजिकच शिवसेनेच्या वाट्याला जाणार, याची कल्पना असतानाही भाजपच्या वतीने या मतदारसंघावर दावा केला जात आहे. या दाव्यामागे इच्छुकांची ‘आर्थिक’शक्ती पणाला लागली आहे. गेल्या वर्षभरापासून भाजपकडून उमेदवारी मिळविण्यासाठी काही इच्छुक सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र आता युती झाल्यावर स्वप्नभंग होणार याची कल्पना आल्याने त्यांनी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना पुढे करून अंबरनाथची जागा भाजपला मागण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भाजपच्या वाढत्या ताकदीचा संदर्भ देत स्थानिक नेत्यांनी ही मागणी केलीदेखील, मात्र या मागणीमागे नेमका हेतू काय आहे, हे सर्वच राजकीय पक्षांच्या नजरेत आले आहे. दुसरीकडे वर्षभर आर्थिक त्याग केल्याने आता निवडणूक लढवू इच्छिणाºयांनी युती तुटावी, यासाठी देव पाण्यात ठेवले आहे.
गेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढल्याने यंदाच्या निवडणुकीतही युती होणार नाही, अशी आस धरून भाजपतर्फे अनेक इच्छुकांनी उमेदवारीसाठी दावा केला. गेल्या निवडणुकीत भाजप काही मतांनी पराभूत झाल्याने यंदाच्या निवडणुकीत दावा करून विजय मिळविण्याची धडपड सुरू झाली. मात्र लोकसभा निवडणुकीत युती झाल्यावर युतीचे वारे विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम दिसत आहेत. त्यातच वरिष्ठ पातळीवरील निर्णयाकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे. अंबरनाथमध्ये भाजपने या मतदारसंघावर दावा केल्यावर स्थानिक पातळीवर शिवसेना आणि भाजप यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. भाजपने हा मतदारसंघ पूर्वीपासून भाजपच्या वाट्याला असल्याचा दावा केला आहे. मात्र, अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचा विचार करता या मतदारसंघावर केवळ ८७ मध्येच भाजपचे (तत्कालीन जनसंघाचे) जगन्नाथ पाटील हे विजयी झाले होते. मात्र, त्यानंतर सलग दोन वेळा या मतदारसंघातून काँग्रेसचे नकुल पाटील विजयी झाले होते. त्यामुळे त्या काळातच भाजपचा दावा फोल ठरला. त्यानंतर पाटील यांचा पराभव करून सलग तीन वेळा शिवसेनेचे साबीर शेख हे विजयी झाले. तर २००४ च्या निवडणुकीत आमदार किसन कथोरे यांनी शेख यांचा पराभव करून राष्ट्रवादीला विजय मिळवून दिला. मात्र, २००९ च्या निवडणुकीत मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यावर हा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेकडे आला. त्यामुळे या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व होते असा दावाच चुकीचा ठरला आहे. मात्र भाजपची ताकद अंबरनाथमध्ये वाढत आहे, हे वास्तव सर्वज्ञात आहे. शिवसेनेच्या वाट्याला आलेला मतदारसंघ भाजपला सोडावा एवढी ताकद खरोखरच निर्माण झाली आहे का, याची चिकित्सा करण्याची गरज व्यक्त होत आहे.
दुसरीकडे शिवसेनेकडे ही जागा असतानाही शिवसेनेतून इच्छुकांची गर्दी दिसत नाही. मात्र, ज्या मित्रपक्षाला युती झाल्यावर उमेदवारी मिळणार नाही, याची कल्पना आहे, त्याच मित्रपक्षात सात जण इच्छुक आहेत. त्यामुळे हे उमेदवार युती होण्यासाठी नव्हे तर युती तुटण्याची प्रतीक्षा करत आहेत. भाजपतील काही इच्छुकांनी वर्षभर विविध उपक्रम राबवित आपली दावेदारी दाखल केली आहे. वर्षभरापूर्वी भाजपमध्ये दाखल होऊन उमेदवारीची स्वप्ने पाहिली जात आहेत.