बुलेट ट्रेनला जमिनी देण्यास भाजपा नेत्यांचाही विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 01:12 AM2018-01-11T01:12:52+5:302018-01-11T01:13:02+5:30
मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाला जमिनी देण्याबाबत प्रथम भागधारक, सल्लागार व लोकप्रतिनिधींच्या घेण्यात आलेल्या बैठकीत, भाजपाच्या खासदार-आमदारांसह सर्वच लोकप्रतिनिधी व शेतक-यांनी विरोध केला.
- सुरेश काटे
तलासरी : मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाला जमिनी देण्याबाबत प्रथम भागधारक, सल्लागार व लोकप्रतिनिधींच्या घेण्यात आलेल्या बैठकीत, भाजपाच्या खासदार-आमदारांसह सर्वच लोकप्रतिनिधी व शेतक-यांनी विरोध केला.
तालुक्यातील ८ गावांतील १०९ भूखंड मिळून एकूण ३० हेक्टर जमीन या प्रकल्पात जाणार आहे. त्याबाबतची सविस्तर माहिती देण्यासाठी तलासरी पंचायत समिती सभागृहात ही बैठक तहसीलदारांनी सोमवारी घेतली. या वेळी तहसीलदार विशाल दौडकर, सभापती सविता डावरे, उपसभापती दुमाडा, पोलीस निरीक्षक कैलास बर्वे, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.
भाजपा खासदार चिंतामण वनगा व आमदार पास्कल धनारे यांनीही या प्रकल्पाला कडाडून विरोध करून, आदिवासी शेतकºयांच्या मुळावर असलेल्या प्रकल्पाच्या विरोधात शेतकºयांची बाजू घेऊन, आपल्याच सरकारच्या विरोधात दंड थोपटले आहेत.
आमदार पास्कल धनारे यांनी यापूर्वीच बुलेट ट्रेनला विरोध दर्शविला होता, तर भाजपाचे करज गावाचे सरपंच लुईस काकड यांनी भर सभेत आम्ही जरी सत्ताधारी पक्षाचे असलो, तरी बुलेट ट्रेन आदिवासी शेतकºयांच्या फायद्याची नसून, त्याने शेतकरी उद्ध्वस्त होत असल्याचे सांगत प्रकल्पाला विरोध केला. प्रसंगी शेतकºयांचे तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला.
स्थानिकांना फायदाच नाही
तालुक्यातील मानपाडा, वसा, कवाडा, झरी, पाटीलपाडा, वरवाडा, आमगाव व उपलाट अशा ८ गावांतून बुलेट ट्रेन जाणार असून, त्यासाठी १०९ भूखंड आणि एकूण ३०.२६ क्षेत्र हेक्टर जमीन वापरली जाणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार तर नाहीच, शिवाय ट्रेनचे स्थानक येथे नसेल. त्यामुळे बुलेट ट्रेन फक्त धनदांडग्यासाठी असल्याचा आरोप करीत या प्रकल्पाला जमिनी न देण्याची भूमिका स्थानिकांनी घेतली.