#VidhanSabha2019: भाजपाच्या कार्यक्रमात रंगले मानापमान नाट्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 05:20 AM2019-09-16T05:20:44+5:302019-09-16T05:22:19+5:30
भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत रविवारी येथील राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या कार्यक्रमात मानापमान नाट्य रंगले.
ठाणे : जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत रविवारी येथील राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या कार्यक्रमात मानापमान नाट्य रंगले. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरील आठ खुर्च्यांवर मान्यवर आधीच स्थानापन्न झाले होते. त्यामुळे दोन दिवसांपूर्वीच भाजपमध्ये आलेल्या गणेश नाईकांनी तेथून काढता पाय घेतला, तर माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पायऱ्यांवरच बैठक मारली.
रविवारी संध्याकाळी ५ वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमासाठी गडकरी रंगायतनचे सभागृह भरगच्च भरले होते. त्यामुळे बहुतांश कार्यकर्ते सभागृहाच्या पॅसेजमध्येच उभे होते. या दरम्यान व्यासपीठावर नड्डा यांच्यासमवेत खासदार विनय सहस्रबुद्धे, खा. कपिल पाटील, भाजपचे राष्ट्रीय संघटक भूपेंद्र यादव, सहसंघटक व्ही. सतीश, आमदार संजय केळकर, आ. निरंजन डावखरे आणि भाजपचे शहराध्यक्ष संदीप लेले आदी उपस्थित होते. किरीट सोमय्या हे व्यासपीठावर स्थान मिळण्याची अपेक्षा असल्यामुळे श्रोत्यांच्या पहिल्या रांगेत बसले नाहीत. बराच वेळ व्यासपीठाजवळ फिरत होते, पण नड्डा आल्यानंतरही त्यांना व्यासपीठावर बोलावण्यात आले नाही. त्यामुळे त्यांची पहिल्या रांगेतील खुर्चीही गेली. नाइलाजास्तव त्यांनी पायऱ्यांवरच बैठक मांडली.
दरम्यान, काही वेळातच गणेश नाईक तिथे आले, पण व्यासपीठ आधीच भरलेले असल्यामुळे ते खालीच उभे राहिले. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमप्रसंगी या दोघांची नावे शेवटी घेण्यात आली. मात्र, सोमय्या आणि नाईक व्यासपीठावर गेले नाहीत. एकूणच प्रकार पाहून नाईकांनी लगेच कार्यक्रमस्थळावरून काढता पाय घेतला. नाईक यांचा आज वाढदिवस होता. त्यामुळे ते पुढील कार्यक्रमासाठी गेल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. मात्र, वाढदिवसाच्या कार्यक्रमाची गडबड असली, तर ते कार्यक्रमस्थळी आलेच नसते, अशी चर्चा यावेळी उपस्थितांमध्ये रंगली होती.
नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील एका हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र, त्यांचा राग एवढा अनावर झाला होता की, ते या कार्यक्रमासही उपस्थित न राहता थेट नवी मुंबईला रवाना झाल्याचे समजते. माजी खासदार संजीव नाईक यांच्यावरही अन्यत्र उभे राहण्याची वेळ आली.
हारतुºयांची अपेक्षा नाही - गणेश नाईक
रविवारी माझा वाढदिवस होता. त्यामुळे कार्यक्रमांची गडबड होती. गडकरी रंगायतनमध्ये माझा अपमान झाला नाही. तीन दिवसांपूर्वीच मी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पक्षाकडून आपणास मोठ्या मानाची किंवा हारतुºयांची अपेक्षा नसल्याचे गणेश नाईक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आपली भाजपवर कोणतीही नाराजी नसल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले.
>अन्याय दूर झाला - नड्डा
३७० कलम रद्द केल्यामुळे जम्मू-काश्मीरमधील एससी, एसटी प्रवर्गांतील उमेदवारांसह गुजर व बरकलवाल समाजाला आता कोणत्याही निवडणुकीसाठी उभे राहता येणार आहे. तेथील लोकांवर होत असलेला अन्याय हे कलम रद्द केल्यामुळे दूर झाल्याचे जे. पी. नड्डा यांनी यावेळी सांगितले. हे कलम रद्द केल्यामुळे जम्मू-काश्मीरचा होणारा विकास, तेथील जनतेला होणारे फायदे आदी मुद्द्यांवर नड्डा यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.