उल्हासनगर : जीन्स कारखदारांची चालिया हॉल येथे बैठक घेत १५ दिवसांत तोडगा काढण्याची ग्वाही राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. नोव्हेंबरमध्ये सेनेने कारखानदारांची बैठक घेऊन दिलासा देण्याचे आश्वासन दिले. तोच कित्ता भाजपाने गिरवून शिवसेनेवर कुरघोडी केली.शहरातील वालधूनी नदीला प्रदूषित केल्याचा ठपका सामाजिक संघटनेसह न्यायालयाने जीन्स कारखान्यावर ठेवला. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका व महावितरणने कारखान्यांचा वीज, पाणी पुरवठा खंडित केला आहे. कारखाने महिन्याभरापासून बंद झाले आहेत. हजारो कामगार बेकार होऊन त्यांचे कुटूंब रस्त्यावर आले. जीन्स वॉश कारखाने बंद झाल्यावर, वालधूनी नदी स्वच्छ झाली का? असा प्रश्न जीन्स कारखानदारांनी केला आहे. कारखानदार शिवसेना-भाजपाच्या नेत्यांच्या घराचे उंबरठे झिजवत असल्याचे चित्र आहे.मागील महिन्यात आमदार बालाजी किणीकर, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, जीन्स वॉश कारखाना संघटनेचे अध्यक्ष परशुराम पाटील यांच्या पुढाकाराने जीन्स वॉश कारखान्यांची बैठक खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतली होती. शिंदे, आमदार बालाजी किणीकर यांच्या मागणीनुसार पर्यावरण मंत्री रामदास कदम, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले होते. मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना जिल्हाधिकारी यांच्यासह प्रदूषण मंडळ, एमआयडीसी यांची बैठक घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, पुन्हा जीन्स कारखानदारांची बैठक शनिवारी चालिया पंचायत हॉल मध्ये झाली. राज्यमंत्र्यांनी जीन्स कारखानदारांचे म्हणणे ऐकून १५ दिवसात तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
भाजपाची सेनेवर कुरघोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 1:04 AM