आनंद दिघेंची खेळी खेळून २८ वर्षांनंतर भाजपने हिसकावले ठाणे, इतिहासाची पुनरावृत्ती होणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 07:57 AM2024-04-09T07:57:44+5:302024-04-09T07:58:28+5:30

अगोदर ताकद दाखवली मग उमेदवार : बाळासाहेब ठाकरे - प्रमोद महाजन बैठकीत झाला होता निर्णय

BJP won Thane after 28 years after playing Anand Dighe's game, will history repeat itself? | आनंद दिघेंची खेळी खेळून २८ वर्षांनंतर भाजपने हिसकावले ठाणे, इतिहासाची पुनरावृत्ती होणार ?

आनंद दिघेंची खेळी खेळून २८ वर्षांनंतर भाजपने हिसकावले ठाणे, इतिहासाची पुनरावृत्ती होणार ?

अजित मांडके

ठाणे :  तब्बल २८ वर्षांनंतर एका खेळीचा वचपा काढत भाजपने ठाणे जिल्ह्यात आपणच कसे मोठे भाऊ आहोत, हे वरिष्ठ नेत्यांना दाखवून दिले आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी १९९६मध्ये शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांनी कल्याण, भिवंडी, पालघर वगैरे परिसरात भाजपपेक्षा शिवसेनेची ताकद कशी जास्त आहे, याची आकडेवारी जिल्ह्याच्या नकाशावर मांडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामार्फत भाजप नेते प्रमोद महाजन यांना दिली होती. कागदावर शिवसेनेने ताकद अधिक असल्याचे सिद्ध केल्यावर भाजपचा नाइलाज झाला होता. विद्यमान खासदारांची जागा सोडताना शिवसेनेतर्फे येथे कोण निवडणूक लढवणार, असा प्रश्न आला तेव्हा आनंद दिघे यांनी आपणच निवडणूक लढवणार असल्याचे सांगून बोलती बंद केली होती. 

२८ वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ठाणे लोकसभेत सहापैकी चार आमदार भाजपचे आहेत. नवी मुंबई आणि मीरा - भाईंदर भाजपच्या ताब्यात आहेत. ठाण्यात भाजपचे नगरसेवक आहेत. याशिवाय जिल्ह्यात भाजप वाढत असून, प्रत्येक महापालिकेत भाजपचे संख्याबळ अधिक आहे. आता त्याच दबावतंत्राचा वापर करून भाजपने शिंदे सेनेला आपली वाढलेली ताकद दाखवली व ठाण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच उमेदवार असल्याचे गळी उतरवले.

ठाणे जिल्ह्यात यापूर्वी काँग्रेस आणि त्यानंतर भाजपचे वर्चस्व होते. रामभाऊ म्हाळगी, राम कापसे असा भाजपचा लोकसभेचा इतिहास आहे. त्यावेळेस पालघर, कल्याण, भिवंडी हे ठाणे लोकसभेचाच भाग होते. ठाणे जिल्ह्यात भाजपचे आमदार, खासदार किती, जिल्हा परिषदेत सदस्य किती, महापालिकेची स्थिती काय तसेच शिवसेनेची संघटनात्मक ताकद याची माहिती ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी प्रमोद महाजन यांच्यासमोर मांडली होती. 

शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर...

 शिवसेनेत दोन गट पडल्याने शिवसेनेची मते विभागली जाणार आहेत. त्यानंतर ठाणे लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच निवडणूक लढवत असल्याचे मान्य करून महायुतीचे मेळावे घेण्यास शिंदेसेनेला भाग पाडले. 
 नवी मुंबईतील संजीव नाईक यांनी रविवारपासून मीरा भाईंदरमधून प्रचाराला सुरुवात केली, भाजपची खेळी फत्ते झाल्याचा हा पुरावा मानला जात आहे.

...आणि आनंद दिघे निवडणूक लढविण्याची बातमी पसरली
आनंद दिघे हेच ठाणे लोकसभा लढविणार असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. दिघे यांच्या नावाला विरोध करणार कोण, असा सवाल होता. दिघे लढणार म्हणून भाजपने ठाण्याची जागा शिवसेनेला सोडल्याचे जाहीर केले. विद्यमान भाजप खासदाराचे तिकीट कापण्याची खेळी दिघे खेळले. 

Web Title: BJP won Thane after 28 years after playing Anand Dighe's game, will history repeat itself?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.