अर्ज माघारीतही झाले भाजपाच्या कोंडीचेच प्रयत्न
By admin | Published: May 10, 2017 12:01 AM2017-05-10T00:01:00+5:302017-05-10T00:01:00+5:30
सत्तेसाठी वेगवेगळ््या पक्षांतील गट फोडण्याचे प्रयत्न भाजपाने उमेदवारी देण्यापूर्वी केल्याने सर्व विरोधक एकत्र आले असून अर्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : सत्तेसाठी वेगवेगळ््या पक्षांतील गट फोडण्याचे प्रयत्न भाजपाने उमेदवारी देण्यापूर्वी केल्याने सर्व विरोधक एकत्र आले असून अर्ज माघारी घेईपर्यंत जेथे जमेल तेथे भाजपाविरोधात एकास एक उमेदवार देण्याच्या किंवा लढत कडवी होईल यादृष्टीने आखणीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
भिवंडीच्या राजकारणात स्वतंत्र आघाडी करण्याचे भाजपाचे प्रयत्न फसले असले, तरी त्यांनी कोणार्कशी समझोता केला. पण काँग्रेसचा एक गट, सेनेचे काही कार्यकर्ते, समाजवादी आणि राष्ट्रवादीमधील नाराजांना गळाला लावण्याचा प्रयत्न भाजपाने करून पाहिला. पण त्याला पुरेसे यश आले नाही. काँग्रेसमधील जो गट फुटण्याच्या प्रयत्नात होता, त्यालाच उमेदवारीत प्राधान्य दिल्याने काँग्रेसमधील संभाव्य फूट टळली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातल्याने शिवसेनेतील नाराजांची त्यांच्या पद्धतीने समजूत काढण्यात आली. समाजवादी पक्ष, राष्ट्रवादीतही फुटीरांची चाचपणी झाली होती. पण या पक्षांनीही आपापल्या परीने बंड रोखण्यात यश मिळवले. आता हे सर्व पक्ष भाजपाविरोधात एकत्र आले आहेत. त्यातही कोणार्क आघाडीला पक्षातूनच असलेल्या विरोधामुळे भाजपाची पुरती कोंडी झाली आहे. काँग्रेस आणि समाजवादी पक्ष-राष्ट्रवादीची आघाडी वेगळी असली, तरी त्यांनीही अर्ज माघारीपर्यंत काही जागांवर माघार घेत भाजपा-कोणार्कच्या कोंडीसाठी चर्चा सुरू केल्याचे समजते. विरोधकांची संख्या वाढली, तर मतांची फाटाफूट होईल आणि त्याचा फायदा भाजपाला होईल, हे गृहीत धरून गुरूवारच्या माघारीपर्यंत भाजपाविरोध अधिक कडवा करण्यासाठी विरोधकांची एकजूट झाली आहे.
भिवंडीची संघर्ष यात्रा
मुंबई, ठाणे, उल्हासनगरच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाने फक्त उल्हासनगरमध्ये कलानी कुटुंबाच्या मदतीने सत्ता राखली. आताही पनवेलमध्ये भाजपाची स्थिती तुलनेत चांगली असल्याचा त्या पक्षाच्या नेत्यांचा दावा आहे. पण भिवंडीत तो पक्ष खूपच कमकुवत आहे. तुलनेने काँग्रेस, समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि शिवसेना यांची स्थिती चांगली असून हे सर्व पक्ष भाजपाविरोधासाठी परस्परांच्या संपर्कात आले आहेत.