- राजू काळेभार्इंदर - ऐन शिवजयंतीच्या मुहूर्तावर सत्ताधारी भाजपाने शिवसेनेला जोर का झटका धीरे से देत विरोधी पक्षनेत्याचे दालन स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील यांच्या दालनात विलीन करून चांगलाच धक्का दिला आहे. आॅगस्ट २०१७ मधील पालिका निवडणुकीत दुस-या क्रमांकाचा पक्ष ठरलेली शिवसेना सध्या विरोधी बाकावर बसून काँग्रेससोबत सूत जुळवित आहे. विरोधी पक्षातील क्रमांक एकचा पक्ष ठरलेल्या शिवसेनेने विरोधी पक्षनेता पदावर दावा केला आहे. तो सत्ताधारी भाजपाने अद्यापही रोखून धरला आहे.या पदावरील नियुक्तीची महापौर डिंपल मेहता यांच्याकडून अद्याप घोषणा होत नसल्याने सेनेने अनेकदा आंदोलन करून हे पद पदरात पाडून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न चालविला. मात्र त्यात सेनेची आक्रमकता दिसून येत नसल्याची चर्चा त्यावेळी सुरू झाली असतानाच सेनेच्या दाव्याला आणखी झटका देत सत्ताधाऱ्यांनी पालिका मुख्यालयातील दुसऱ्या मजल्यावर असलेले विरोधी पक्षनेत्याचे दालन थेट तळमजल्यावर स्थलांतर करण्याचा कट रचला. त्यात ते यशस्वी होऊ नये, यासाठी सेनेने पुन्हा आंदोलनाचा पावित्रा घेत आपली आक्रमकता दाखवून देण्याचा पुन्हा प्रयत्न केला. त्याला सत्ताधारी व प्रशासनाने कायद्यावर बोट ठेवून ताटकळत ठेवले. हे पद सेनेला मिळून त्यावर त्वरित विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा व्हावी, यासाठी सेनेने निवडणुकीनंतरच्या पहिल्या महासभेपासून जीवाचे रान केले.मात्र सत्ताधाऱ्यांनी त्याला दाद न देता त्या पदावरील नियुक्तीच्या निर्णयाचा चेंडू महापौरांनी राज्य सरकारकडे टोलवला. राज्य सरकारने देखील त्याचा अधिकार महापौरांचाच असल्याचे स्पष्ट करून निर्णयाचा चेंडू पुन्हा महापौरांकडेच टोलवला. त्यावर अद्याप महापौरांकडून निर्णय झाला नसताना विरोधी पक्षनेत्याच्या दालन स्थलांतराचा निर्णय सत्ताधाऱ्यांकडून गनिमी काव्याने घेण्यात येऊ लागला. त्याची कुणकुण सेनेला लागू न देताच सत्ताधाऱ्यांनी गेल्या आठवड्यात १५ फेब्रुवारी रोजी आयुक्त बी. जी. पवार यांची भेट घेत ते दालन स्थायी समिती सभापती दालनात विलीन करण्यासह त्या नेत्याचे दालन तळमजल्यावर स्थलांतरीत करण्याबाबत चर्चा केली. त्यावर आयुक्तांनी, तो सत्ताधाऱ्यांचा अधिकार असल्याचे स्पष्ट करून दुसऱ्या मजल्यावरील दालन स्थायी सभापतींच्या दालनात विलीन करण्यास सहमती दर्शविल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यानुसार सत्ताधाऱ्यांनी त्या दालनाला ठोकलेले सील परस्पर काढण्यात येऊन ते स्थायी सभापतीच्या दालनात विलीन करीत त्याच्या नूतनीकरणाला सोमवारपासून सुरुवात केली. दरम्यान सेनेने या दालनाचा परस्पर ताबा घेत या नेतेपदावरील दावेदार राजू भोईर यांना अनौपचारिकपणे विरोधी पक्षनेता पदावर विराजमान करण्यात आले होते. प्रशासनाला त्याची कुणकुण लागताच त्याच दिवशी त्या दालनाला सील ठोकण्यात आले होते.
माझ्या दालनाचा विस्तार करण्यासाठी जागा आवश्यक होती. या दालनाला लागूनच विरोधी पक्ष नेत्याचे दालन असल्याने ते विस्तारीकरणासाठी देण्यात यावे, यासाठी आयुक्तांसोबत चर्चा केली. त्याला आयुक्तांनी सहमती दर्शविल्यानेच ते माझ्या दालनाच्या विस्तारीकरणात विलिन करण्यात येऊन त्याच्या नूतनीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे, असं विधान स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील यांनी केलं आहे.