ठाणे : राज्यात महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ भाजपच्या महिला आघाडीने ठाण्यात सोमवारी मूक मोर्चा काढला. या मुद्यावर सरकारने तातडीने पावले उचलण्याची आग्रही मागणी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करताना केली.
भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा माधवी नाईक, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रिधा रशिद आणि महिला आघाडीच्या ठाणे जिल्हाध्यक्षा हर्षला बुबेरा यांनी मूक मोर्चाचे नेतृत्व केले. कोर्टनाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सरकारी विश्रामगृहापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. यात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत महाविकास आघाडीच्या कारभाराबद्दल निषेध करण्यात आला. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी भाजपचे आमदार व ठाणे प्रभारी आशीष शेलार, आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, महापालिकेतील गटनेते संजय वाघुले, प्रदेश सचिव संदीप लेले, महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस तृप्ती पाटील, नयना भोईर यांच्यासह नगरसेविकांची उपस्थिती होती.राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. कोरोना उपचार केंद्रांतही महिलांवर अत्याचार करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दुर्दैवी घटनांची मालिका सुरूच आहे. उत्तर प्रदेशात हाथरस येथील घटनेबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आवाज उठविला. या पक्षांच्या संवेदना महाराष्ट्रातील महिलांवर अत्याचार होताना कोठे असतात, असा सवाल भाजपने निवेदनाद्वारे केला आहे.राजकारणासाठी सोयीस्कर वापरबलात्काराच्या घटनांचाही राजकारणासाठी सोयीस्कर वापर करण्याचा सत्ताधारी पक्षांचा दृष्टिकोन निषेधार्ह आहे. सत्ताधारी आघाडीने महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी गांभीर्याने पार पाडली पाहिजे. महिलांवरील अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.